शिरपूरचे स्वातंत्र्य सेनानी स्मारक दुर्लक्षीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:31 PM2018-08-14T18:31:37+5:302018-08-14T18:32:03+5:30
देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपून त्यांच्या हौतात्म्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारलेल्या येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची गेल्या १५ वर्षांपासून दूरावस्था झाली आहे.
ग्रामपंचायतची उदासीनता: देशासाठी बलिदान देणाºयांचा विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती देणाºया, तसेच लष्करात देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपून त्यांच्या हौतात्म्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारलेल्या येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची गेल्या १५ वर्षांपासून दूरावस्था झाली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती देणाºया शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिरपूर येथे ५८ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य सेनानी स्मारकाची उभारण करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे स्मारक त्यावेळच्या ग्रामपंचायतने उभारून येथे राष्ट्रीय सणानिमित्त सभा, सामाजिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्वातंत्र्य सैनिक आनंदराव मनाटकर, विष्णूजी पौळकर व देशमुख यांनी स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. सुरुवातीची २५ ते ३० वर्षे येथे नियमित कार्यक्रमांचे आयोजन व्हायचे; परंतु कालांतराने या स्मारकावर कार्यक्रम आयोजित करण्याचा विसर पडू लागला आणि त्यामुळे हे स्मारक दुर्लक्षीत झाले. केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीनिमित्त या स्मारकाची साफसफाई केली जाते; परंतु अनेक वर्षांपासून त्याची रंगरंगोटी झाली नसल्याचे दिसते. या ठिकाणी आता घाणकचरा पसरत असून, स्मारकाची फुटतूटही झाली आहे. गत चार वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते दामोदर सारडा यांनी या दुर्लक्षीत स्वातंत्र्य सेनानी स्मारकाच्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतचा ठरावही घेतला; परंतु तो कागदावरच राहिला. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाही या स्मारकाची साफसफाई करण्यात आली नसल्याचे दिसून आले.