‘अग्रिम’बाबत शिवसैनिक धडकले कृषी कार्यालयात; लवकरच मिळणार अग्रिमची रक्कम
By संतोष वानखडे | Published: December 5, 2023 01:49 PM2023-12-05T13:49:31+5:302023-12-05T13:49:50+5:30
अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
वाशिम : पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून शिवसैनिकांनी (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कृषी कार्यालय गाठून कृषी उपसंचालक व पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. लवकरच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करणार असल्याची माहिती, पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कवर यांच्यासह शिष्टमंडळाला दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करीत होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने जिल्ह्यात आंदोलनही केले होते. पीक विमा मंजूर झाल्यानंतरही अग्रिम रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कृषी उपसंचालक धनोडे यांची भेट घेतली.
तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख यांच्याकडे पीक विमा अग्रीम २५ टक्के रक्कमेबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी जिल्ह्याला पीक विम्यापोटी अंदाजे १८० कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती देत, ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, जिल्हा समन्वयक सुरेश मापारी, तालुका प्रमुख रामदास मते पाटील आदी उपस्थित होते.