कारंजा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने ठोकला दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 03:17 PM2019-07-01T15:17:26+5:302019-07-01T15:18:03+5:30

भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा ठोकला आहे.

Shiv Sena claims on Karanja assembly constituency | कारंजा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने ठोकला दावा!

कारंजा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने ठोकला दावा!

googlenewsNext

- प्रफुल्ल बानगावकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली असून भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा ठोकला आहे. भाजपा-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यमान आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या पाटणींचा मतदारसंघ ताब्यात घेणे हेच शिवसेनेसमोर आव्हान आहे. ते त्यांनी पेलल्यास या मतदारसंघाची राजकीय चित्रच बदलण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी याच अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश घेणारे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासाठी ही निवडणुक अतिशय अस्तीत्वाची लढाई आहे. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या माध्यमातून कारंजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा आणि आपली उमेदवारी ‘फायनल’ व्हावी, यासाठी तगडी फिल्डींग लावली आहे. दुसरीकडे शिवसेनेशी काडीमोड करून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विद्यमान आमदार पाटणी यांनी मतदारसंघावर भक्कम अशी पकड निर्माण केली आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीतही कारंजा मतदारसंघ भाजपाच्याच वाट्याला राहावा आणि आपली उमेदवारी पक्की व्हावी, यासाठी पाटणी निश्चीत आग्रही आहेत. हा मतदारसंघ भाजपाकडेच कायम राहिल्यास प्रकाश डहाके एकतर अपक्ष किंवा त्यांच्या जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून निवडणुक रिंगणात उतरतील, अशी राजकीय शक्यता वर्तविली जात आहे; मात्र या शक्यतेला त्यांच्या निकटवर्तियांकडून दुजोरा मिळत नसल्याने सद्या ते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ या भूमिकेत आहेत.
प्रकाश डहाके यांच्यासह शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्यास इच्छूक असलेले रणजीत राठोड, डॉ. सुभाष राठोड, महेश चव्हाण, डॉ. राम चव्हाण यासह अन्य मंडळीही तयारीत आहेत.
शिवसेनेतील उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहता हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला सुटला तरी मित्रपत्र शिवसेनेकडून भाजपाला अपेक्षित सहकार्य मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याचे राजकीय वतुर्ळातून बोलले जात आहे.
यासह मतांचेही मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होवून दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा होण्याची शक्यता असून तो तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी असू शकतो. या पक्षाकडून युसूफ पुंजाणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीचीच होण्याचे संकेत आतापासूनच दिसत आहेत.

मतदारसंघात निर्माण झाला मोठा पेच
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा व शिवसेनेत युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र युती असून त्यात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे; मात्र गत निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने व यावेळीही भाजपाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असल्याने या मतदार संघात मोठा पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Shiv Sena claims on Karanja assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.