‘शिवसेना हाच माझा श्वास आहे!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:40 AM2017-08-01T01:40:11+5:302017-08-01T01:40:35+5:30

वाशिम : बालपणापासून आपल्या रक्तात शिवसेना असून, शिवसेना हाच माझा श्वास आहे, शिवसेना आपण कधीही सोडणार नाही, त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी सोमवारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले

'Shiv Sena is my breath!' | ‘शिवसेना हाच माझा श्वास आहे!’

‘शिवसेना हाच माझा श्वास आहे!’

Next
ठळक मुद्देखासदार भावना गवळीपत्रकार परिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बालपणापासून आपल्या रक्तात शिवसेना असून, शिवसेना हाच माझा श्वास आहे, शिवसेना आपण कधीही सोडणार नाही, त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी सोमवारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले
स्थानिक सिव्हिल लाइन स्थित शासकीय विश्रामगृह येथे खासदार गवळी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना खासदार गवळी म्हणाल्या की, शिवसेना पक्षात आपण सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्ष प्रमुखांनी नेहमी आपल्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे. जनतेनेसुद्धा आपल्यावर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी विजयी केले आहे. आपले राजकीय भवितव्य संपुष्टात आणण्यासाठी कदाचित आपल्या विरुद्ध भाजपात जाण्याच्या वावड्या उठवत असतील तरी यापासून आपण किंचितही विचलीत होणार नसून, शिवसेना पक्ष कदापि सोडणार नाही. शिवसेनेने कायम पद, प्रतिष्ठा दिली आहे. आपण पक्षात राहताना शिवसेनेच्या तळागळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचून आपण शिवसैनिक असो तथा सेनेचे पदाधिकारी असो यामध्ये कधीही भेदभाव वागणूक वेगळी नाही. शिवसेनेची खासदार या नात्याने आपण मतदार संघात रेल्वे असो अथवा रस्ते तसेच अनेक विविध विकास कामे केली आहेत तर अनेक विकास कामे सुरु आहेत. प्रामाणिकपणे काम करणे व सर्वांना सोबत घेऊन चालणे यावर आपला भर असतो, असे म्हणत भाजपात जाण्याच्या वावड्या उठविणाºयांचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, असे खासदार भावना गवळी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत गवळी यांचे स्विय सहायक अजय गिलचे, जि.प.सभापती विश्वनाथ सानप, अनिल पाटील, उपाध्यक्ष माणिकराव देशमुख, सुरेश मापारी, गजानन भांदुर्गे, विष्णूपंत भुतेकर, अ‍ॅड.विनोद खंडेलवाल, विवेक नरवाडे, नीलेश पेंढारकर, प्रकाश अपूर्वा, बंडू शिंदे, सुनील सुर्वे, संतोष जोशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Web Title: 'Shiv Sena is my breath!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.