सरसकट कर्जमाफीपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही
By admin | Published: June 13, 2017 01:18 AM2017-06-13T01:18:53+5:302017-06-13T01:18:53+5:30
खासदार सावंत : पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ता सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारुन केलेल्या शिवसैनिकांच्या कार्याला यश आले आहे. सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. तसेच कर्जमाफी झाकी है, स्वामिनाथन आयोग अभी बाकी है, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा खा.अरविंद सावंत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.
ते शहरातील शिवसेना भवन येथे १२ जून रोजी पार पडलेल्या पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ता, सभेत बोलत होते. यावेळी खा.सावंत, खा.भावना गवळी, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड, शिवसेना तालुका प्रमुख रवी पवार, शहर प्रमुख राजू देशमुख, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख राजू ठाकरे, डॉ.श्याम जाधव, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुभाष राठोड, सागर मांडन, विशाल राठोड, देवानंद हळदे, विनोद तुळजापुरे, नंदु पाटील, सुनील जाधव, मनोहर राठोड, अजय देशमुख, नरहरी कडू आदींसह इतरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाषणात रवि पवार यांनी कर्जमुक्त होणारच, या अभियानासाठी संपूर्ण परिसर पिंजुन काढला. एकूण १५ हजार शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठी अर्ज भरुन घेतले. यासह तालुक्याच्या आढावाबाबत सांगितले. सावंत यांनी म्हटले की, यापूर्वी आघाडी शासनाच्या काळात कर्जमुक्ती झाली, तेव्हासुद्धा शिवसेनेने कर्जमाफी देता की जाता अभियान राबविले होते. तेव्हासुद्धा आघाडी सरकारला शिवसेनेने कर्जमुक्ती देण्यास भाग पाडले होते. आजसुद्धा शिवसेना सत्तेत असताना श्ेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीकरिता अग्रेसर राहून कर्जमाफीची घोषणा पदरात पाडून घेतली.
सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, तसेच तत्काळ शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देणे, तसेच बोगस बियाणे रोखण्यासाठी शिवसैनिकांनी कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि पवार, सूत्रसंचालन प्रा.विकास चौधरी, आभार डॉ.श्याम जाधव यांनी मानले.