कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा अंतिम निर्णयापर्यंत!
By admin | Published: June 6, 2017 01:09 AM2017-06-06T01:09:12+5:302017-06-06T01:09:12+5:30
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यास प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका पाहता त्यांना कर्जमुक्ती आवश्यक आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत तो संकटातून सावरल्या जाणार नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक असून, कर्जमाफी होईपर्यंत शिवसेनेचा लढा कायम राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते डॉ. सुभाष राठोड यांनी केले. ते मानोरा तालुक्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरणे कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी ५० हजार अर्ज शेतकऱ्यांचे भरल्या जाणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे.
राज्यभर शिवसंपर्क अभियानाद्वारे शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. शिवसेनेच्यावतीने जिल्हा, तालुका स्तरावर तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुखांकडून जिल्हा परिषद सर्कलनिहाय अर्ज भरुन घेण्यास सुरुवात केली आहे. मानोरा तालुक्यात डॉ. सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेस सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवसेना तालुकाप्रमुख रवी पवार यांनी इंझोरी जिल्हा परिषद सर्कलमधील इंझोरी, मसणी, जामदरा, दापुरा बु., दापुरा खुर्द, चौसाळा, तोरनाळा, उमरदरी येथील शेतकऱ्यांचे अर्ज भरुन घेतले आहेत. यावेळी छोटेखानी कार्यक्रमात डॉ. सुभाष राठोड यांनी शिवसेना पक्ष सत्तेत असला, तरी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत असल्यामुळे सामाजिक जबाबदारीतून शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय तो सुखी होऊन शकत नसल्याचे म्हटले.
तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज भरून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याकरिता तालुक्यातील सर्वच शिवसैनिक प्रयत्नशील असल्याचे शहरप्रमुख राजु देशमुख, डॉ. श्याम जाधव, उपप्रमुख डॉ. करसडे यांनी कळविले आहे.
--