शिवाजी महाराज हेच खरे समाजसुधारणेचे प्रणेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:28+5:302021-09-22T04:46:28+5:30
रिसोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त जाती वर्गातील लोकांना जबाबदारी आणि अधिकार देऊन समाजसुधारणेचा आदर्श घालून दिला म्हणून तेच ...
रिसोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त जाती वर्गातील लोकांना जबाबदारी आणि अधिकार देऊन समाजसुधारणेचा आदर्श घालून दिला म्हणून तेच खरे समाजसुधारणेचे प्रणेते ठरतात, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बनसोड यांनी केले. ते स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने खामगाव येथील सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे महाविद्यालय आणि आंबेडकर राईट हिस्ट्री काँग्रेसच्या सह आयोजित केलेल्या ऑनलाइन इतिहास राष्ट्रीय परिषदेमध्ये बोलत होते.
स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक धार्मिक व राजकीय चळवळी आणि वर्तमान या विषयावर आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्राचार्य. डॉ. जे. बी. देव्हडे यांनी केले. सामाजिक धार्मिक चळवळींनी स्वातंत्र्यपूर्वकाळात मोलाची भूमिका पार पाडली, असे त्यांनी सांगितले. प्राचार्या नीलिमा देशमुख यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. मुख्य रिसोर्स पर्सन असणाऱ्या उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथील डॉ. इंदिरा सूर्यवंशी यांनी स्त्री सुधारणा चळवळीचा विस्तृत आढावा घेतला. या चळवळीमुळेच आज भारतातील स्त्रियांची स्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेत सक्षम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. चिखली येथील डॉ. विष्णू पडवाल यांनी अध्यक्षीय मनोगतातून सामाजिक धार्मिक चळवळी यांचा अभ्यास सातत्याने होणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खामगाव येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ.प्रमोद चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख डॉ.श्रीहरी पितळे यांनी केले.याप्रसंगी चांगला इनफॅक्ट असणाऱ्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित शोध निबंधाच्या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला देशभरातून झूम मीटिंगद्वारे शंभर आणि यूट्यूबद्वारे शंभर सभासदांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला जीवन विकास शिक्षण संस्थचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे स्मृति आरोग्य आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सद्गुण देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.