शिवशाही बसचे फाटकच उघडेना; प्रवाशांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:31 PM2019-09-10T15:31:11+5:302019-09-10T15:31:19+5:30

शिवशाही बसचे फाटक दहा मिनिटे उघडलेच नाही. त्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.

Shivshahi bus gates not open; Travelers' detachment | शिवशाही बसचे फाटकच उघडेना; प्रवाशांचा खोळंबा

शिवशाही बसचे फाटकच उघडेना; प्रवाशांचा खोळंबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) लाल बसगाड्या बिघाडामुळे मार्गावर बंद पडण्याचे प्रकार वाढत असतानाच आता आधुनिक सुविधायुक्त शिवशाही बसगाड्यांचाही फटका प्रवाशांना बसत आहे. वाशिम येथील आगारातच हा प्रकार पाहायला मिळाला. येथे आलेल्या शिवशाही बसचे फाटक दहा मिनिटे उघडलेच नाही. त्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर ही बस आगारात नेण्यात आल्याने बसमधील प्रवाशांना तास दीड तासाचा खोळंबा सहन करावा लागला.
एसटी महामंडळाच्या लालपरीची अवस्था दयनीय झाली आहे. बहुतांश बसगाड्या मार्गात बंद पडत असल्याने प्रवाशांना मार्गावर उन्हापावसात ताटकळत बसावे लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेतच. आता एसटी महामंडळाने दीड वर्षांपूर्वी ताफ्यात दाखल केलेल्या शिवशाही बसगाड्याही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या बसगाड्यांच्या दुरुस्तीची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची मोठी पंचाईत होत आहे. या बसचे तिकिट साधारण बसच्या तुलनेत दुप्पट असतानाही अत्याधुनिक आणि आरामदायक असल्याने प्रवाशी या बसचा आधारही घेत आहेत. तथापि, या बस आता प्रवाशांसाठी फायद्याऐवजी त्रासदायकच ठरत आहेत. असाच प्रकार वाशिम आगारात सोमवारी पाहायला मिळाला. या बसस्थानकावर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास औसा, लातूर मार्गे अमरावती ही शिवशाही बस पोहोचली. त्यावेळी आतमधील वाशिमचे प्रवासी खाली उतरण्यासाठी, तर मंगरुळपीर, कारंजा, अमरावतीकडे जाणारे प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी लगबग करू लागले; परंतु या बसचे फाटकच जाम झाले. प्रवाशांची त्यामुळे तारांबळ उडाली. जवळपास १० मिनिटांंनंतर या बसचे फाटक उघडले. या प्रकारामुळे आतमधील प्रवाशांना त्रास झालाच शिवाय ही बस दुरुस्तीसाठी वाशिमच्या आगारात नेण्यात आल्याने पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तास दीड तास खोळंबत बसावे लागले. हा प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवासी एसटीच्या बसगाड्यांनाच त्रस्त झाले आहेत.
 

वाशिम बसस्थानकावर शिवशाही बसच्या फाटकात बिघाड झाल्याची माहिती मिळाली नाही. तसेच ही बस आगारात दुरुस्ती आणल्याचेही कळले नाही. तथापि, हा प्रकार प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला असून, या संदर्भात चौकशी करून वरिष्ठस्तरावर माहिती देऊ आणि प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बसगाड्यांची आवश्यक तपासणी करण्याची मागणीही करू.
-विनोद इलामे
आगार प्रमुख, वाशिम

Web Title: Shivshahi bus gates not open; Travelers' detachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.