ग्रामपंचायतींमध्ये आज साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:04+5:302021-06-06T04:30:04+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्याभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा मुख्यालय येथे जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.