धक्कादायक...अंगणवाडीतील खिचडीत आढळल्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:25 PM2019-06-29T13:25:44+5:302019-06-29T13:26:37+5:30
पार्डी ताड: मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ च्यावतीने बालकांना वितरीत करण्यात आलेल्या खिचडीत शनिवारी अळ्या आढळून आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड: मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ च्यावतीने बालकांना वितरीत करण्यात आलेल्या खिचडीत शनिवारी अळ्या आढळून आल्या. यामुळे पालकवर्गात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्यालाही धोका असल्याचे स्पष्ट होत असून, पोषण आहाराची जबाबदारी असलेल्या महिला बचत गटाच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकार शुक्रवारी कळला आहे.
महिला आणि बालविकास प्रकल्पांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रातून शासन निर्देशानुसार विविध योजनांची अमलबजावणी करण्यासह पोषण आहाराचे नियमित वितरणही केले जाते. या ठिकाणी पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी गावातील महिला बचत गटाकडे देण्यात आली आहे. या ठिकाणी नेहमीप्रमाणे बालकांना वितरीत करण्यासाठी महिला बचत गटाच्यावतीने खिचडी शिजवून बालकांना वितरण करण्यात आले. बालकांनी ही खिचडी घरी नेली. त्यावेळी एक दोन बालकांच्या खिचडीत पालकांना अळ्या आढळून आल्या. त्यामुळे पालकवर्गात खळबळ उडाली. या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भिती असल्याने पालकांनी अंगणवाडी सेविकेच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. त्यानंतर ही माहिती पंचायत समितीस्तरावर देण्यात आली. त्यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिकेने या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता. त्यांना दाखविलेल्या खिचडीच्या नमुन्यात अळ्या आढळून आल्या नाहीत हे उल्लेखनीय. (वार्ताहर)
महिला बचतगटाला कारणे दाखवा नोटीस
पार्डी ताड येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ अंतर्गत शुक्रवारी वितरीत करण्यात आलेल्या खिचडीत अळ्या आढळल्याचे कळले. त्यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिकेने या कें द्राला भेट देऊन पाहणी केली आणि पोषण आहाराची जबाबदारी असलेल्या महिला बचतगटाला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यात अंकिता गावंडे या लाभार्थी बालिकेच्या खिचडीत अळ्या आढळल्याची तक्रार प्राप्त झाल्याने सदर महिला गट निर्धारित पाककृतीनुसार पोषण आहार शिजवित नसल्याचे स्पष्ट होत आहे, असे नमूद करीत नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने आपल्या बचतगटाकडील पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी का काढून घेण्यात येऊ नये, याचे स्पष्टीकरण दोन दिवसांच्या आत प्रकल्प कार्यालयाला सादर करावे, असे सुचित करण्यात आले आहे.
पार्डी ताड येथील अंगणवाडी केंद्राला शुक्र वारी भेट दिली. त्यावेळी तेथे अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. या ठिकाणी वितरीत करण्यात आलेला पोषण आहार पाककृतीनुसार नव्हता, हे दिसून आले. त्यामुळे महिला बचत गटाला कारणे दाखवा नोटीस दिली. खिचडीत अळ्या दिसल्या नाहीत.
-एस. व्ही. बोळे
अंगणवाडी पर्यवेक्षिका
शेलुबाजार (पं.स. मंगरुळपीर)
माझी पाल्य ईश्वरी शेेंद्रे हीला शुक्रवारी २८ जुन रोजी अंगणवाडी केंद्र क्रमांक ३ मधून पोषण आहारांतर्गत खिचडी देण्यात आली होती. तिला देण्यात आलेली खिचडी निरखून पाहिली असता त्यात अळ्या आढळून आल्या. त्यामुळे आम्ही तिला खिचडी खाऊ दिली नाही.
-संदीप शेंदे्र
पालक, पार्डी ताड