धक्कादायक...! जीवंत आजीबाईला तलाठ्याने मृत दाखविले!श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद, आता...
By संतोष वानखडे | Published: June 18, 2023 02:57 PM2023-06-18T14:57:07+5:302023-06-18T14:57:56+5:30
तलाठ्याच्या चुकीचा फटका आजीबाईला बसला असून, किमान पेन्शन तरी सुरू करावी, अशी आर्त हाक आजीबाईने दिली आहे.
वाशिम : मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रत्नप्रभाबाई रामराव देशमुख (८५) या जीवंत आजीबाईचा मृत असल्याचा दाखला तलाठ्याने तहसिलदारांकडे दिल्याने जानेवारी २०२३ पासून त्यांची पेन्शन बंद झाली. तलाठ्याच्या चुकीचा फटका आजीबाईला बसला असून, किमान पेन्शन तरी सुरू करावी, अशी आर्त हाक आजीबाईने दिली आहे.
मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रत्नप्रभाबाई रामराव देशमुख (८५) या आजीबाईला सन २००५ मध्ये मानोरा तहसील कार्यालयातून श्रावण बाळ योजने अंतर्गत पेन्शन लागू करण्यात आली. घरात एकटी महिला, कमविता कोणी नाही, वय जास्त झाल्याने मजुरीचे काम होत नसल्याने पेन्शन योजनेचा मोठा आधार मिळतो. रत्नप्रभाबाई देशमुख या जून महिन्यात बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेल्या असता, बँकेकडून पेन्शन जमा झाली नाही असे उत्तर मिळाले.
पेन्शनबाबत नेमकी काय अडचण आली, याची विचारणा करण्यासाठी त्या नातेवाईकासह तहसिल कार्यालयात गेल्या असता, तलाठी सागर चौधरी यांनी या महिलेचा मृत्यू झाला असा अहवाल २९ जुलै २०२२ रोजी कार्यालयास दिल्याने पेन्शन बंद झाल्याचे उत्तर एेकून रत्नप्रभाबाई व नातेवाईकांना धक्काच बसला. कोणतीही शहानिशा न करता चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर कारवाइ व्हावी तसेच पेन्शन पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.
शासन आपल्या दारी; पण न्याय केव्हा?
सध्या वाशिम जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. शासकीय योजनेचा लाभ घरपोच दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मग, कारखेडा येथील रत्नप्रभाबाई देशमुख या ८५ वर्षीय आजीबाईला म्हातारपणात आपण जीवंत असल्याचे दाखविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असतानाही, संबंधितांच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही? असा संतप्त सवाल जनमाणसातून उपस्थित केला जात आहे.
तहसील कार्यालयकडून पेन्शन सुरु असलेल्या व्यक्तीने हयातीचे दाखले व इतर माहिती देणे आवश्यक आहे. एक महिना वाट पाहली. मला रत्नप्रभा रामराव देशमुख यांचेकडून हयातीचा दाखला मिळाला नाही. म्हणून मला वाटले सदर महिला ही जीवंत नसावीख म्हणून मी अहवाल दिला असेल.
- सागर चौधरी, तलाठी, कारखेडा