स्वस्तधान्य दुकानदार धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:58 PM2018-01-12T14:58:48+5:302018-01-12T15:01:54+5:30
वाशिम : मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले.
वाशिम : मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत या मालेगावच्या घटनेचा निषेध नोंदविला तसेच ‘पॉस मशीन’ने धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला.
मालेगाव येथील एका स्वस्त धान्य दुकानात ग्राहकाला आधारकार्ड लिंक करण्याचे सांगितल्यावरून गुरूवारी दुकानदार व ग्राहकात वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती. जिल्हा पुरवठा विभागाने आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना आधार कार्डसंदर्भात सूचना दिल्या जातात, असे स्वस्त धान्य दुकानदारांनी निवेदनात नमूद केले. आधार कार्ड मागितल्यावरून स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण होत असेल तर ही घटना निंदनीय असून, यापुढे ग्राहकांकडून आधार कार्डची मागणी केली जाणार नाही, असा निर्णय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने घेतला. स्वस्त धान्य दुकानदारांना कोणतेही संरक्षण नाही आणि ग्राहकांना कायद्याची भीती नसल्यामुळे आधार कार्ड सक्तीचे करण बंद केले जाईल तसेच सर्व दुकानदार ‘पॉस मशिन’ तहसिल कार्यालयात जमा करतील, असेही निवेदनात नमूद आहे. मालेगाव येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.