भरचौकातील दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:06 AM2020-07-18T11:06:13+5:302020-07-18T11:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हाधिकारी यांनी १३ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता शहरातील प्रतिष्ठाने उघडण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हाधिकारी यांनी १३ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता शहरातील प्रतिष्ठाने उघडण्याची व बंद करण्याच्या वेळेत बदल केला आहे. परंतु वाशिम शहरातील भरचौकातील काही दुकाने चक्क रात्री ९ ते ९.३० वाजेदरम्यान उघडी आढळून आलीत. दुकाने बंद करण्याची वेळ ही दुपारी २ वाजेपर्यंतचीच आहे.
जिल्हाधिकारी यांच्या १३ जुलै रोजीच्या आदेशान्वये मालेगाव, वाशिम, कारंजा लाड व मानोरा या शहरांमध्ये १५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, बँक सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. केवळ दवाखाने (पशुवैद्यकीयसह), मेडिकल २४ तास सुरु थावण्यास मुभा देण्यात आली आहे. वरील सहाही शहरांमध्ये केवळ दुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता दुकाने बंद करण्याच्यावेळी वाशिम शहरातून पोलीसांचे वाहन फिरुन उघडी असलेली दुकाने बंद करण्याचे भोंग्याव्दारे आवाहन करुन दुकाने बंद केली जातात. पोलीसांची गाडी आली की, दुकानांची शटर फटाफट दुकानदारांकडून खाली ओढल्या जातात. पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा अर्ध शटर उघडून काही जण उघडतांना दिसून आले आहेत. वाशिम शहरातील मुख्य चौक असलेल्या पाटणी चौकात रात्री ९.५४ मिनिटापर्यंत एक दुकान उघडे आढळून आले. या दुकानाचे छायाचित्र घेत असतांना ताबडतोब शटर खाली करण्यात आले . तसेच अकोला नाका परिसरातील नगरपरिषद कॉम्पलेक्समधील दुकान ९.२२ मिनिटापर्यंत उघडेच होते.
पोलिसांची गाडी येताच नावापुरती दुकाने बंद
काही प्रतिष्ठान चालकांकडून दुकाने बंद करण्याच्या वेळा पाळण्यात येत नसल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुभा देण्यात आल्याानंतरही काही दुकाने दुपारी २ वाजतानंतर दुकानाचे अर्ध शटर बंद करुन ग्राहकांना आतमध्ये घेवून व्यवहार करीत असल्याचे दिसून येतात. दुपारी दोन वाजल्याबरोबर वाशिम पोलीस विभागाच्यावतिने वाहने फिरवून उघडी असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडत आहेत. यातही काही महाभाग दुकानदार पोलीसांची गाडी आल्यानंतर दुकान बंद करण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात करताना दिसून येत आहेत. पोलीस निघून गेली की दुकाने पुन्हा काही वेळ सुरु दिसून येतात.
नियमांची कडक अंमलबजावणी आवश्यक
निर्धारित वेळेनंतरही सुरु राहणाऱ्या दुकानाबाबत प्रशासनाने कडक अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.
दुधांचे स्टॉलही उघडेच
दुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाईचे आदेश असतांना दुध विक्री सुरु दिसून येत आहे.