आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:16 PM2020-07-10T12:16:48+5:302020-07-10T12:17:19+5:30

सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Shops open till 7 pm now! | आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी!

आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात लॉकडाऊनची नवीन नियमावली १ जुलैपासून लागू करण्यात आली होती. यामध्ये अंशत: बदल करून यापूर्वी परवानगी देण्यात आलेली सर्व दुकाने, आस्थापना ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ९ जुलै रोजी जारी केला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आता ‘अनलॉक’च्या टप्प्यात शिथिलता दिली जात असून, यामुळे अर्थचक्र तसेच जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येते. ८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी होती. यामध्ये ९ जुलै रोजी अंशत: बदल केला असून, आता सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकान, आस्थापनांमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्या व्यक्तींनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या आस्थापना, दुकानांवर गर्दी दिसून येईल, अशा आस्थापना, दुकाने तत्काळ बंद करण्यात येतील. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.


जिल्ह्यातील शाळा, धार्मिक स्थळे बंदच राहणार
लॉकडाऊनची नवीन नियमावली १ जुलैपासून जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तसेच धार्मिक स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश राहणार नाही. ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील, याची खात्री संबधित शाळेच्या प्रशासनाने करावी, तसेच पालकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्यात येऊ नये, असे आदेशात नमूद आहे.

 

Web Title: Shops open till 7 pm now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.