सायंकाळी साडेपाचपर्यंत दुकाने ‘शटर डाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:15 AM2021-03-13T05:15:45+5:302021-03-13T05:15:45+5:30
.................. बँकांना तीन दिवसांची सुटी वाशिम : गुरुवारी महाशिवरात्री, त्यानंतर शुक्रवारचा अपवाद वगळता पुन्हा दुसरा शनिवार व रविवार असल्याने ...
..................
बँकांना तीन दिवसांची सुटी
वाशिम : गुरुवारी महाशिवरात्री, त्यानंतर शुक्रवारचा अपवाद वगळता पुन्हा दुसरा शनिवार व रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. यामुळे व्यवहार करण्यासाठी शुक्रवार हा एकच दिवस ग्राहकांना मिळणार आहे.
.............
थकबाकी अदा करण्याचे आवाहन
वाशिम : महावितरणच्या ग्राहकांकडे विद्युत देयकांची कोट्यवधी रुपयांची रक्कम थकीत आहे. यामुळे कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी केले आहे.
............
उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळेना
वाशिम : येथील पुसद रस्त्यावरील रेल्वेगेटनजीक तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे.
.................
शेतातील बिजवाई कांदा बहरला
वाशिम : थेट कंपनीसोबत करार करून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बिजवाई कांद्याचे उत्पन्न घेणे सुरू केले आहे. या वर्षी अनुकूल वातावरणामुळे हे पीक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे.
............
रस्ता नादुरुस्त; नागरिक हैराण
वाशिम : शहरातील मन्नासिंह चौकापासून कालेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. न.प.ने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पुसद नाक्याकडून हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झाले; मात्र दर्जा व्यवस्थित न राखल्याने रस्ता अल्पावधीतच खराब झाला. त्यापुढच्या रस्त्याचीही बिकट अवस्था झाली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
..............
जुने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
वाशिम : जुने शहरातील धृव चौक परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला; मात्र तो अत्यल्प स्वरूपात होता. यामुळे अनेकांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी मिळाले नाही.
जुने शहरात बहुतांश घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी दुपारी नळाला पाणी आले; मात्र लवकरच बंददेखील झाले. यामुळे अनेकांनी विकत मिळणाऱ्या टँकरच्या पाण्याचा आधार घेतला, अशी माहिती संदीप चिखलकर यांनी दिली.
.............
खासगी वाहनेही प्रवाशांनी खचाखच
वाशिम : ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना सायंकाळी ५ नंतर पटकन वाहन मिळत नाही. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास एस.टी.सोबतच खासगी वाहनेही प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून वाहत असल्याचे दिसून येत आहे.
................
दुकानांमधील गर्दीने कोरोनाची भीती
वाशिम : सायंकाळी ५ वाजेनंतर शहरातील कपड्यांची दुकाने बंद होत असली तरी त्यापूर्वी मात्र तुफान गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
..............
वाहने मिळाल्याने पोलिसांची सोय
वाशिम : जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी नवी दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली. यामुळे विशेषत: रात्रगस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे.
...............
कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले
जऊळका रेल्वे : ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचणी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांचा आकडाही वाढल्याचे दिसून येत आहे. पूर्वीसारखी भीती मात्र राहिली नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
..............
स्वच्छतागृहाची दुरवस्था
मालेगाव : तहसील कार्यालयानजीक असलेल्या बसस्थानकात अद्याप मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून दुर्गंधी सुटत असल्याने चालक, वाहक व प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
............
महामार्गावर गतिरोधकाची मागणी
वाशिम : वाशिम ते मंगरूळपीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहरापासून जागमाथा मंदिरापर्यंत या रस्त्याला गतिरोधक नसल्याने अपघातांची शक्यता उद्भवली आहे. गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
.....................
आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, १० मार्च रोजी पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.