कोरोना लसीकरणाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:28+5:302021-06-28T04:27:28+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत २० दिवसांपूर्वी राज्य सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र बाजारपेठेत नागरिकांची तुफान ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत २० दिवसांपूर्वी राज्य सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी आणि डेल्टा प्लसचा धोका पाहता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या अनलॉक पद्धतीत राज्य सरकारकडून बदल करण्यात आले आहे. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांत अधिक कठोरता आणून अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात येत्या तीन ते चार आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, कोरोनावर सध्या तरी लस हाच एकमेव उपाय असल्यावरही लस घेण्याबाबत अद्यापही सर्वसामान्यांमध्ये अनुत्साह दिसून येत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तर प्रशासनाची डोकेदुखी वाढू शकते. सध्या १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाला मात्र अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे २६ जून रोजी प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येऊन लस घेण्याचे आवाहन करण्यात आले.