कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा शिरपुरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:40+5:302021-06-30T04:26:40+5:30
शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करण्याची मुभा दिल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या ...
शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करण्याची मुभा दिल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शिरपूर जैन येथे लसीकरणाचे प्रमाण अत्यंत समाधानकारक होते; परंतु कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर आरोग्यवर्धिनी केंद्रात लस उपलब्ध असतानाही लस घेण्यास नागरिक उदासीन असल्याने लसीकरणाची संख्या मंदावली होती. त्यात २१ जूनपासून शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर लसीकरणासाठी प्रतिसाद वाढला आणि आता मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. शनिवारच्या लसीकरणानंतर आरोग्यवर्धिनी केंद्रात लस उपलब्ध झाली नाही. रविवार, सोमवार, मंगळवारला आरोग्यवर्धिनी केंद्रात लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रात चकरा घालत आहेत.
-------------
२१ जूनपासून केवळ ३०० डोस उपलब्ध
शासन निर्देशानुसार १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात २१ जूनपासून ३०० डोस उपलब्ध झाले होते, तर पूर्वीचे १३० मिळून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत ४३० लोकांवर लसीकरण करण्यात आले. त्यात शिरपूर, अमानी, करंजी, तिवळी येथील लसीकरणाचा समावेश होता. हा पुरवठा अतिशय तोकडा आहे.
------------
कोट:
आरोग्यवर्धिनी केंद्रात शनिवारी ३०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याशिवाय आधी उपलब्ध १३० लसी मिळून २१ जूनपासून शिरपूर, अमानी, करंजी, तिवळी येथील ४३० जणांचे लसीकरण करण्यात आले.
-विनोद खंडागळे,
डाटा एन्ट्री ऑपरेटर,
आरोग्यवर्धिनी केंद्र, शिरपूर