पशुवैद्यकीय केंद्रात औषधींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:26+5:302021-07-28T04:43:26+5:30
ऑक्टोबर २०१८पासून शिरपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी पशुवैद्यकाची खर्चिक सेवा घ्यावी लागत आहे. त्यातच ...
ऑक्टोबर २०१८पासून शिरपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी पशुवैद्यकाची खर्चिक सेवा घ्यावी लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून पशुवैद्यकीय केंद्रात औषधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे पशुवैद्यकीय केंद्र असलेल्या शिरपूर पशुवैद्यकीय केंद्रात तीन वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नसणे व औषधीचा तुटवडा निर्माण होणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींसाठी शोभनीय बाब नाही, अशा प्रतिक्रिया पशुपालकांमधून उमटत आहेत. याविषयी पशुवैद्यकीय केंद्रातील परिचर शिंदे यांनी तापीच्या गोळ्या उपलब्ध नसल्याचे मान्य केले.
०००
जि.प. अध्यक्षांनी लक्ष देण्याची मागणी
शिरपूरचे रहिवासी तथा शिरपूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डाॅ. शाम गाभणे यांच्याकडे पशुसंवर्धन व कृषी विषय समितीचे सभापतीपदही आहे. शिरपूर येथील पशुवैद्यकीय केंद्रात तीन वर्षांपासून कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी नाही. या पदाचा प्रभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. पशुपालकांची गैरसाेय दूर करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डाॅ. गाभणे यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.