'लॉकडाउन'मुळे कामगारांचा तुटवडा; शासकीय कापूस खरेदी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:59 AM2020-04-29T10:59:11+5:302020-04-29T10:59:49+5:30
वाढत्या तापमानात दिवसाच्या वेळी जिनिंग करणे शक्य नसल्याने शासकीय कापूस खरेदी अडचणीत आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर उपाय करून सुरू करण्याचे निर्देश असले तरी, लॉकडाऊनमुळे कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच वाढत्या तापमानात दिवसाच्या वेळी जिनिंग करणे शक्य नसल्याने शासकीय कापूस खरेदी अडचणीत आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक, सीसीआय आणि फेडरेशनच्या प्रतिनिधींसह बैठकही घेतली. त्यात विविध विषयांवर चर्चा करून खरेदी सुरू करण्यावर निर्णय घेण्यात आला.
लॉकडाउनच्या काळात सीसीआयने कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र जिल्ह्यात उन्हाचा वाढता पारा आणि कामगारांच्या तुटवड्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सीसीआयने तयारी दर्शविल्यानंतरही वाशिम जिल्ह्यात खरेदी सुरु होऊ शकली नव्हती. जिल्ह्यात मंगरुळपीर, कारंजा, मानोरा आणि अनसिंग या ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. या ठिकाणी खरेदी सुरू असतानाच जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर कापूस खरेदी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. य् दरम्यान, कोरोना संसर्गासाठी आवश्यक उपाय आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून शेतकºयांचा कापूस खरेदी करण्याची तयारी सीसीआयने दर्शविली. तथापि, उपरोक्त तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती.
कामगारांसह आवश्यक व्यक्तींना पास
गेल्या महिनाभरापासून बंद असलेली शासकीय कापूस खरेदी कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या अटीसह सीसीआयने निश्चित केलेल्या अटीवर वाशिम जिल्ह्यात सुरू होणार असली तरी, यात अनेक अडचणी येणार आहेत. कामगारांचा तुटवडा असतानाच उपलब्ध कामगारांच्या प्रवासाचा, शेतकºयांच्या वाहतुकीचा प्रश्नही यात समाविष्ट आहे. तथापि, या अडचणी दूर करण्यासाठी जिनिंग, प्रेसिंगचे मालक, शेतकरी आणि कामगारांसाठी पास उपलब्ध करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शविली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रवि गडेकर यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीनंतर दिली.