वाशिममध्ये २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान गड, किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 07:49 PM2018-02-04T19:49:10+5:302018-02-04T19:49:20+5:30
वाशिम : पाहतानाही धडकी भरावी असे सरळसोट कडे, ऊन, वारा, पाऊस याचे सातत्याने आक्रमण झेलून आजही पराक्रमाची साक्ष देत उभे असलेले बुरुज, गडाच्या समृध्दीची झलक देणा-या वास्तू, भव्य तटबंदी, देखण्या शिलाकलेचे दर्शन घडविणारे दरवाजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील १०८ हून अधिक गड, किल्ल्यांच्या एकाहून एक सरस छायाचित्रांचे प्रदर्शन वाशिममध्ये २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. ही माहिती हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे यांनी दिली.
लोकमत न्यूजनेटवर्क

हिंदवी परिवार, शिवछत्रपती बहूउद्देशिय युवा संस्था व राजे वाकाटक वाचनालयाच्या संयुक्त आयोजनातून येत्या २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान दररोज सकाळी १्र० ते ०७ या वेळेत स्थानिक वाकाटक वाचनालयात ही छायाचित्र प्रदर्शनी शाळकरी मुलामुलींपासून ते मोठ्यांपर्यत विनामुल्य स्वरुपात भरविण्यात येणार आहे. या माध्यमातून आजच्या पिढीला शिवरायांच्या अतुल्य पराक्रमाचे दर्शन घडणार आहे. प्रदर्शनीच्या अनुषंगाने दुर्मिळ नाणे प्रदर्शनीही ठेवण्यात आली आहे. संगमनेरचे दुर्गमित्र व दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट यांनी गेली ३५ वर्षे महाराष्ट्रातील द-याखो-यात फिरुन शिवरायांच्या स्वराज्यातील गडकोटांना आपल्या कॅमे-यात टिपले आहे. त्यातील शिवरायांच्या पराक्रमाशी, त्यांच्या जीवनाशी निगडीत निवडक गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. परकीय आक्रमकांच्या सततच्या हल्ल्याने होरपळून निघालेल्या रयतेला छत्रपती देणारा किल्ले शिवनेरी, त्याचा इतिहास, भुगोल, स्वराज्याला आकार देण्यात अग्रेसर असलेला तोरणा, स्वराज्याची पहिली राजधानी ठरलेला आणि स्वराज्यावर आलेल्या अनेक जीवघेण्या संकटाचा मुक साक्षीदार असलेला राजगड, शंभुराजांच्या जन्माबरोबरच, मिर्झा राजाशी झालेल्या तहाची आठवण करुन देणारा पुरंदर, अफजलखानाच्या बलाढ्य संकटावेळी राजांच्या पाठी भक्कमपणे उभा राहणारा प्रतापगड, बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम उजळवणारा पन्हाळा आणि त्यापुढे विशालगडाच्या मार्गावरील भयाण वाटणारी घोडखिंड अर्थात पावनखिंड, शिवरायांच्या अचूक नियोजनातून सरनौबत प्रतापराव गुर्जर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हल्ला करुन अशक्य ते शक्य करुन दाखविलेले किल्ले साल्हेर व मुल्हेर, गरुडालाही भिती वाटावी असा कडा सर करुन विजयश्री मिळविणार्या तानाजींचा सिंहगड, अशा वेगवेगळ्या गड-किल्ल्यांची वेगवेगळ्या ऋतूत काढलेली छायाचित्रे सोबतच नगर जिल्हयातील हरिश्चंद्रगड, रतनगढ, पट्टा किल्ला, अलंग-कुलंग व मदन गडाची श्रृंखला या प्रदर्शनीचे विशेष आकर्षण राहणार आहे.