मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून श्री बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:58 PM2018-01-31T14:58:53+5:302018-01-31T15:00:00+5:30
मंगरुळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
मंगरुळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या यात्रोत्सवात संस्थानकडून विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ‘श्रीं’ची महापूजा व अभिषेक कार्यक्रम असून सकाळी ११ वाजता श्री बिरबलनाथ महाराज यांचे लघुचरित्र ग्रंथाचे वाचन हभप विठ्ठलदास महाराज ठाकरे व संच रा.पिंप्री खु. यांचे मधूर वाणीतून होणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता हनुमंत महिला भजन मंडळ मंगलधाम यांचा भजनाचा कार्यक्रम आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता ते सायंकाळी ५ पर्यंत ‘श्रीं’चा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. महाप्रसाद वितरण व्यवस्था श्री जय हनुमान मंडळ वरूड हे करणार आहेत. रात्री ८ वाजता हभप मानिकराव पाटील रा.कारखेडा यांचा किर्तनाचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे. महाप्रसाद पुजेकरीता संत दर्शनीनाथ महाराज रा.दिल्ली, संत भोलेनाथ महाराज वनोजा, संत अभेदनाथ गुरु सेवानाथजी रामापूर मठ यांची उपस्थिती राहणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गावामधून ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक निघणार असून दुपारी १२ ते १.३० दहीहांडी व गोपाळकाला हभप पल्लाव देशमुख व संच रा.गिरोली यांचेमधून वाणीतून तसेच श्री संत बाबू महाराज राहीत साहीत यांचे हस्ते होणार आहे. पालखी सोहळा मिरवणूकीमध्ये विविध महिला वारकरी भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता चित्रऋषी वृद्धाश्रम तुळजापूर येथील वृद्ध महिला व पुरुषांना संस्थानकडून कपडे, ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे. संत श्री अच्युत महाराज भजन स्पर्धा समिती मंगरुळपीर यांच्याकडून एक लाख रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.