पोहरादेवी-पंचाळा रस्त्याची चाळण; खड्यात बेशरमचे झाड लावून ग्रामस्थांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 03:48 PM2022-09-03T15:48:24+5:302022-09-03T15:57:41+5:30
यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्याने मानोरा तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यन्त दयनीय झाली आहे
संतोष वानखेडे
फुलउमरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी ते पंचाळा रस्त्याची चाळण झाल्याने आणि याकडे संबंधित यंत्रणा लक्ष देत नसल्याचे पाहून, नागरिकांनी पाणी साचलेल्या जागेवर शनिवारी (दि.३) बेसरमची झाड लावून रोष व्यक्त केला.
यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्याने मानोरा तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यन्त दयनीय झाली आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे खड्यात रस्ता की रस्त्यावर खडे समजणे कठीण झाले आहे.वाहनधारकांना आपले वाहन रस्त्याने चालविणे जिकिरीचे झाले आहे.श्रीक्षेत्र पोहरादेवी ते पंचाळा रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे मंगरूळपीर व दिग्रस आगाराच्या बसेस बंद झाल्यामुळे तात्पुरते रस्त्यावरील खडे बुजवून नागरिकांना दिलासा देण्यात यावा म्हणून नागरिकांनी निवेदन दिले होते. मात्र काहीच फरक पडत नसल्यामुळे रविवारी रस्त्यावरील खड्यात साचलेल्या पाण्यात बेशरमचे झाड लावून संबंधीत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी संजय महाराज, विनोद राठोड, बलदेव चव्हाण, बाळू राठोड, धिरजराज महाराज, गदर महाराज यांसह गावातील नागरिक सहभागी झाले होते.