वाशिम जिल्ह्यात खरिपातील गळिताच्या पेऱ्यात लक्षणीय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:48 PM2018-09-14T14:48:15+5:302018-09-14T14:48:43+5:30
गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकºयांनी गळीत पिकांच्या पेºयाकडे पाठ केली आहे. सोयाबीन हे तेलवाण वगळता तीळ, सूर्यफूल आदि गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.
खरीप हंगामात साधारणपणे पावसाचा आधार मिळत असल्याने तीळ, सूर्यफुल, भुईमुग या गळीत पिकांची पेरणी करण्यात येते. पावसामुळे शेतकºयांना या पिकांपासून बºयापैकी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते. वाशिम जिल्ह्यातही साधारण १५ वर्षांपूर्वी सूर्यफुल, भुईमुग आणि तीळ या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात व्हायची; परंतु जंगलाचे प्रमाण घटल्याने वन्यप्राण्यांचा शेतशिवारात धुडगुस सुरू झाला. हरीण, निलगाय, रानडुकरासह इतर वन्यप्राणी गळीताच्या पिकांवर ताव मारून शेतकºयांचे नुकसान करू लागले. त्यातच वातावरणातील बदलामुळे या पिकांच्या उत्पादनाची फारसी शाश्वतीही शेतकºयांना राहिली नाही. त्यामुळे शेतकºयांनी खरीप हंगामातील गळीत पिकांकडे हळूहळू पाठ करायला सुरुवात केली. यंदाच्या खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी अवघ्या ८ हेक्टरवर, तर तिळाची पेरणी अवघ्या १३९ हेक्टरवर करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर गळीत पिकांची पेरणी १८९ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, यात सर्वाधिक प्रमाण कराळाचे आहे.
भुईमुगाचा पेरा निरंक
वन्यप्राण्यांचा शेतशिवारातील धुमाकूळ, तसेच वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे नगण्य दर आदि कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी खरीप हंगामातील भुईमुगाचा पेराच बंद केला आहे. भुईमुगाच्या ऐवजी कमी खर्चाचे आणि कमी जोखमीचे पीक म्हणून शेतकºयांनी सोयाबीनकडे कल केला आहे. परिणामी यंदाही वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रावरही भुईमुगाची पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.