‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 04:26 PM2020-02-01T16:26:30+5:302020-02-01T16:26:36+5:30
शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १३ फेबु्रवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या; मात्र ‘टीईटी’ उतीर्ण न झालेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. दरम्यान, शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यास बहुतांशी यश मिळाले असून ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी वर्तविले आहेत.
२०१३ पासून विविध शाळांवर कार्यरत ज्या शिक्षकांनी आतापर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण केली नाही, अशा सर्वांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. यामुळे मात्र संबंधित शिक्षकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. त्यामुळेच राज्यभरातून त्यास विरोध होत असून शिक्षक महासंघानेही ‘महाराष्ट्र राज्य टीईटी शिक्षक कृती समिती’ची स्थापना करून शिक्षण विभागाच्या या निर्णयास विरोध दर्शविणे सुरू केल्याचे भोयर यांनी सांगितले.दरम्यान या विषयावर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी चर्चा करून शिक्षकांसाठी जाचक ठरू पाहणाऱ्या ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली असता, त्यांनी ते मान्य केले असून ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली.