तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:46 PM2018-04-20T13:46:35+5:302018-04-20T13:46:35+5:30
वाशिम - गत काही वर्षांपासून तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी महासंघाने शासनदरबारी पाठपुरावा केला.
वाशिम - गत काही वर्षांपासून तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी महासंघाने शासनदरबारी पाठपुरावा केला. याची दखल घेत आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल विभागाने दिले आहेत, अशी माहिती तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी शुक्रवारी दिली.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघातर्फे विविध टप्प्यात आंदोलने करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठकही झाली असून, याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरूवारी सांगितले. तलाठ्यांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला होता. हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी वारंवार करण्यात आली. त्या अनुषंगाने तलाठी कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचे मार्च २०१८ पर्यंतच्या प्रस्तावांचा समावेश करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल विभागाने कक्ष अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू झाली असून, यामुळे तलाठ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे श्याम जोशी यांनी सांगितले.
तलाठ्यांना लॅपटॉप मिळणार
यापूर्वी तलाठी, मंडळ अधिकाºयांना लॅपटॉप, प्रिंटर्सचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही तलाठी व मंडळ अधिकाºयांना लॅपटॉप, प्रिंटर्स मिळालेले नाहीत. या पृष्ठभूमीवर अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी उपलब्ध निधीतून लॅपटॉप, प्रिंटर्सची खरेदी करावी आणि ज्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्स मिळाले नाहीत, त्यांना तातडीने लॅपटॉप, प्रिंटर्सचे वितरण करावे, अशा सूचना महसूल विभागाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या आहेत.
तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत १६ एप्रिल रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत काही सकारात्मक निर्णय झाले असून, याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहेत. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्स खरेदीसाठी निधीची तरतूद तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नाबाबत ठोस आश्वासन मिळाल्याने सदर प्रश्न निकाली निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
- श्याम जोशी, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ.