सेनगाव ते मालेगाव महामार्गावर चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 06:24 PM2020-11-21T18:24:49+5:302020-11-21T18:25:35+5:30
Sengaon to Malegaon highway News वाहनचालकांची दिशाभूल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मालेगाव : सेनगाव ते मालेगाव या ४६१ ब या राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येत असल्याने वाहनचालकांची दिशाभूल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
४६१ ब क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या नाल्या, रस्त्याच्या बाजूला माहिती फलक, दिशादर्शक फलक व मॅग्नेटिक पट्ट्या लावण्याचे काम सुरू आहे. दिशादर्शक फलक लावताना कोणत्याही प्रकारचे तारतम्य दिसत नाही. त्यामुळे वाहनधारक संभ्रमात पडून दिशा चुकत आहेत. मालेगाव शहराजवळील एका रस्त्यावर विद्युत उपकेंद्राजवळ एक दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावला असून त्यावर चुकीच्या दिशेने बाण दाखविले आहे. रिसोडकडे जाणारे वाहनचालक हे मेहकरकडे जात आहेत. तर मेहकरकडे दर्शवलेल्या बाणाकडे मेहकरचा रस्ता नाही. त्यामुळे वाहनचालकांना पुढे अर्धा किलोमीटर जाऊन नागपूरच्या मार्गाने जावे लागत आहे. हा चुकीचा फलक पाहून वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. हे फलक पेव्हर ब्लॉकवर लावल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. पेव्हर ब्लॉकवर फलक लावल्यामुळे पादचाऱ्यांना सुद्धा तेथून जाता येत नाही. चुकीच्या ठिकाणी लावलेला फलक रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावा व दिशादर्शक फलक बदलावा अशी मागणी होत आहे.