वजन मापात पाप; शेतकऱ्यांना ताप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:21+5:302021-09-22T04:46:21+5:30
शीतल धांडे रिसोड : वजन मापात घोळ करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार एका शेतकऱ्याच्या तक्रारीने २० सप्टेंबर ...
शीतल धांडे
रिसोड : वजन मापात घोळ करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार एका शेतकऱ्याच्या तक्रारीने २० सप्टेंबर रोजी समोर आणला आहे. घरून मोजून आणलेले सोयाबीन बाजार समितीच्या अडतमध्ये १३ किलो कमी भरल्याने वजन मापात घोळ तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चिखली येथील रमेश अंभोरे नामक शेतकऱ्याने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर त्यांना १३ किलो सोयाबीनचे पैसे देण्यात आले.
रिसोड बाजार समिती नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. आता सोयाबीनचा हंगाम असून, मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आवक येत आहे. त्यामुळे वजनकाटे अधिकृत व व्यवस्थित असणे आवश्यक आहे. सर्वच अडतमधील वजनकाटे व्यवस्थित आहेत किंवा नाही, याची वारंवार पडताळणी बाजार समिती प्रशासनाने करणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे; मात्र अशी पडताळणी नियमित होत नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सोमवार, २० सप्टेंबर रोजी चिखली येथील शेतकरी रमेश अंभोरे यांनी १९ क्विंटल ९३ किलो सोयाबीन घरून मोजून आणले. एका अडतमध्ये विक्रीसाठी सोयाबीन ठेवले असता, वजनकाटा करताना १९ क्विंटल ८० किलो वजन भरले. १३ किलो वजन कमी भरल्याने अंभोरे यांनी यासंदर्भात संबंधित अडत्या आणि बाजार समिती सचिवाकडे दाद मागितली. यावेळी मध्यस्थी करीत अंभोरे यांना १३ किलो सोयाबीनचे पैसे देऊन या वादावर पडदा टाकण्यात आला; मात्र या निमित्ताने वजनकाट्यात घोळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
०००००
कोट
सोमवारी रिसोड बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. घरी वजनकाटा केला असता १९ क्विंटल ९३ किलो होते. बाजार समितीत १९ क्विंटल ८० किलो वजन भरले. याबाबत बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर १३ किलो सोयाबीनचे पैसे देण्यात आले. हा प्रकार अन्य शेतकऱ्यांसोबत होऊ नये, अशी आपली मागणी आहे.
- रमेश अंभोरे, शेतकरी
.......
कोट
मॉईश्चरमुळे थोड्या फार प्रमाणात मालाच्या वजनात घट होऊ शकते. शेतकऱ्यांची तक्रार गांभीर्यपूर्वक घेऊन समन्वयातून १३ किलो धान्याचे पैसे संबंधित अडत्यास शेतकऱ्याला देण्यास सांगितले. बाजार समितीच्या ओट्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अचूक मोजमाप व रास्त भाव देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे.
विजय देशमुख
सचिव, कृउबास रिसोड.
...
कोट
आमच्या अडतमध्ये शेतमालाचे अचूक मोजमाप केले जाते. आजपर्यंत एकाही शेतकऱ्याची वजनासंदर्भात एकही तक्रार नाही. संबंधित शेतकऱ्याचा गैरसमज झाला आहे. केवळ वाद, तंटा होऊ नये या उद्देशाने सचिवांच्या सूचनेनुसार १३ किलो धान्याचे अतिरिक्त पैसे दिले आहेत.
गोलू अग्रवाल
अडते
210921\img_20210921_160948.jpg
विजय देशमुख सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड