जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:48+5:302021-05-22T04:36:48+5:30
जिल्ह्यात एकूण १३ पोलीस ठाणे आहेत. त्यात ९२ अधिकारी व १३९८ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील ...
जिल्ह्यात एकूण १३ पोलीस ठाणे आहेत. त्यात ९२ अधिकारी व १३९८ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत हवी असल्यास त्यांना यापुढे ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाचवेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच हेल्पलाईन असावी, असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.
......................
काॅल येताच कळणार लोकेशन
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कुठून आला, याचे लोकेशन कळण्याची व्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यासह इतरही बाबींना आळा बसणार आहे.
...................
१५ चारचाकी, ३० दुचाकी वाहने ताफ्यात दाखल
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी १५ चारचाकी वाहने व ३० दुचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. सदर वाहने १ मे रोजी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली. या अद्ययावत वाहनांमुळे पोलिसांना आपले कर्तव्य अधिक गतीने बजाविण्यासाठी मदत होत आहे.
....................
३० पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
राज्यातील इतर जिल्ह्यांसह वाशिम जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
.......................
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा
जिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ११२ नंबर डायल करायचा आहे. त्यापुढच्या अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस मदतीला धावून येतील, असे नियोजन करणे सुरू आहे.
नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून लवकरच ही सुविधा जिल्हाभरात पुरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली.
..................
कोट :
गेल्या काही वर्षांत पोलीस दल अधिक ‘हायटेक’ करण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सातत्याने केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही घटना घडल्यास त्याठिकाणी पोलीस तात्काळ पोहचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम