साहेब, या चिखलातून आणखी किती दिवस अंगणवाडीत जावे लागणार? चिमुकल्यांचा सवाल
By संतोष वानखडे | Published: July 9, 2024 06:42 PM2024-07-09T18:42:57+5:302024-07-09T18:43:18+5:30
स्थानिक प्रशासन रस्ता कामाकडे लक्ष देईना
वाशिम : आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षणावर जिल्हा प्रशासनाने ‘फोकस’ केले असतानाही, स्थानिक प्रशासन मात्र या गंभीर मुद्याकडे फारसे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चिखलमय रस्त्यावरून दिसून येते. लोणी बु. येथील झोपडपटीकडे जाणारा चिखलमय रस्ता तुडवत चिमुकल्यांना अंगणवाडी जावे लागत आहे.
ग्रामीण भागात अद्यापही फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथील झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर चिखल होतो. हा रहदारीचा रस्ता असल्याने येथून नागरिकांची ये-जा असते. या रस्त्यानेच चिमुकल्या विद्यार्थ्यांना अंगणवाडीत जावे लागते. पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. चिखलमय रस्ता पाहून अनेकदा चिमुकली मुले अंगणवाडी जाण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र, शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याने पालकवर्ग हा आपल्या पाल्याचे मन वळवित त्यांना अंगणवाडीत जाण्यासाठी प्रोत्साहित करतात.
चिखलातून वाट शोधत चिमुकले अंगणवाडी केंद्र गाठत आहेत. रस्ता दुरूस्तीची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतू, अद्यापही ना स्थानिक प्रशासनाने दखल घेतली, ना पंचायत समिती प्रशासनाने या रस्त्याबाबत चिमुकल्यांसह पालकांना आश्वस्त केले. शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळत नसेल तर चिमुकल्या मुलांच्या मनावर नकारात्मकेचे भाव उमटण्याची भीतीही पालकांमधून वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणावर विशेष भर दिल्याचे सर्वश्रूत आहे. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्रांचे रुपडे पालटण्यावर, इमारती बोलक्या करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील पालकवर्गही भारावून गेला असून, चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या आठ दिवसात या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.