साहेब, या खड्ड्यात झाडे लावायची की हाडे मोडून घ्यायची? चिखली येथील प्रकार

By संतोष वानखडे | Published: January 17, 2024 01:57 PM2024-01-17T13:57:52+5:302024-01-17T13:59:56+5:30

खड्ड्यात 'बेशरम'ची झाडे लावून निषेध आंदोलन

Sir, should we plant trees in this pit or break the bones? Type at Chikhli | साहेब, या खड्ड्यात झाडे लावायची की हाडे मोडून घ्यायची? चिखली येथील प्रकार

साहेब, या खड्ड्यात झाडे लावायची की हाडे मोडून घ्यायची? चिखली येथील प्रकार

संतोष वानखडे, वाशिम: रिसोड तालुक्यातील चिखली येथील कवठा मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने तेथे पाण्याचे डबके तयार झाले. खड्ड्यातून, पाण्यातूनच वाहने चालवावी लागत असल्याने हाडे खिळखिळी होत आहेत. या गंभीर प्रकाराकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारी रोजी ग्रामस्थांनी खड्ड्यात बेशरमचे झाड लावून दिरंगाईबाबत निषेध नोंदविला.

रिसोड तालुक्यातील साधारणत: साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या चिखली येथे रस्त्यांची समस्या कठिण बनली आहे. चिखली ते कवठा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून, या रस्त्यावर चिखली गावात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचत असल्याने या रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाले आहे. पाण्यातूनच रस्ता शोधत वाहनधारकांना ये-जा करावी लागते. खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने काही वाहनधारक खड्ड्यातच पडल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत.

रस्त्याचा कंत्राट घेताना संबंधित कंत्राटदाराला रस्त्याची देखभाल-दुरूस्तीची हमी घ्यावी लागते. या हमीवरच रस्त्याचा कंत्राट मिळत असतानाही, रस्ता तयार केल्यानंतर अनेक कंत्राटदार रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष करतात. अनेकवेळा रस्ता दुरूस्तीची मागणी केल्यानंतरही कोणी लक्ष देत नसल्याचे पाहून १७ जानेवारी रोजी चिखलीवासियांनी खड्ड्यातच बेशरमचे झाड लावून निषेध आंदोलन केले. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष लाड, उपसरपंच घनश्याम लाड, माजी उपसरपंच डाॅ. अशोक लाड, ज्ञानेश्वर लाड, संदीप काळे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Sir, should we plant trees in this pit or break the bones? Type at Chikhli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम