CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सहा पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २१ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 06:03 PM2020-06-10T18:03:08+5:302020-06-10T18:03:20+5:30
बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार, शेलुबाजार एक आणि कारंजा एक असे एकूण सहा रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १० जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार, शेलुबाजार एक आणि कारंजा एक असे एकूण सहा रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १० जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत १३ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. या रुग्णाला एप्रिल महिन्यातच रूग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर कुकसा फाटा (ता. मालेगाव) येथे ट्रक चालक व क्लिनर पॉझिटिव्ह आले. यापैकी क्लिनरचा मृत्यू तर चालकाने कोरोनावर मात केली. त्यानंतर मुंबईवरून मालेगावला परतत असलेली महिला आणि तिच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह आले. यापैकी एकाचा मृत्यू तर पाच जणांनी कोरोनावर मात केली. वाशी (नवी मुंबई) येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेली ६० वर्षीय महिला तसेच मध्यप्रदेशातून वाशिम येथील रेल्वे स्टेशन चौक परिसरात परतलेल्या युवतीचा कोरोना चाचणी अहवालही ३ जून रोजी पॉझिटिव्ह आला. ४ जून रोजी नवी दिल्ली येथून कारंजा तालुक्यातील दादगाव येथे परतलेली महिला पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर बोराळा हिस्से येथील एक जण आणि या रुग्णाच्या संपर्कातील एक जण, मुंबई येथून पोहरादेवी (ता. मानोरा) येथे आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षीय बालक असे तीन जण पॉझिटिव्ह आढळले. मुंबई येथून मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे आलेल्या एका जणाचा अहवाल ९ जूनला पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, १० जून रोजी एकूण सहा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २१ वर पोहचली आहे. यामध्ये १३ रुग्ण सक्रिय आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या सहा अहवालांमध्ये चार जण हे बोराळा हिस्से येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील तर एक जण शेलुबाजार आणि एक जण कारंजा येथील असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. शेलुबाजार येथे आरोग्य विभागाची चमू दाखल झाली असून, या रुग्णाच्या संपर्कात सात ते आठ जण आल्याची माहिती आहे. कारंजा येथेही आरोग्य विभागाची चमू दाखल झाली.
डॉक्टर, कर्मचारी निगेटिव्ह
बोराळा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात वाशिम येथील एका खासगी रुग्णालयातील चार डॉक्टर व चार कर्मचारी आले होते. या सर्वांना क्वांरटीन केले होते. या सर्वांंचे थ्रोट स्वॅब नमुना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले.