पीक कर्ज वितरणात सहा हजार सभासदांची नव्याने भर!
By admin | Published: July 7, 2016 02:12 AM2016-07-07T02:12:54+5:302016-07-07T02:14:41+5:30
पालकमंत्र्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी संथ गतीने : केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने गाठले उद्दिष्ट!
वाशिम : खरीप पीक कर्ज वाटपात यावर्षी सहा हजार नव्या सभासदांची भर पडली आहे. दुसरीकडे पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दस्तुरखुद्द पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांनी दिलेले असतानाही, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत काही राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्टपूर्ती करता आली नाही.
२0१५ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीक कर्जरुपी कुबड्याच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेचा अपवाद वगळता उर्वरित बँका जुलै महिन्यातही फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्यांना येत आहे. ३१ मे पूर्वी पीक कर्ज वितरणाचे ८0 टक्के उद्दिष्ट्य गाठण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक प्रशासनाची बैठक घेऊन पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना दिल्या. तालुका व मंडळ स्तरावर बैठका घेण्यात आल्या. पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. कारवाईच्या भीतीने काही राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाला प्राधान्य दिले, तर काही बँकांनी प्रशासनाच्या निर्देशांना धाब्यावर बसविले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सात राष्ट्रीयीकृत बँकेचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बँका ७0 टक्क्यांच्या आत आहेत.
४ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता एकाही बँकेला पीक कर्ज वाटपाचे १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. ४ जुलैपर्यंत एकूण ९८ हजार ७२१ शेतकर्यांना, ७६७ कोटी ८१ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३४६ कोटी ३२ लाख, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँक ४२१ कोटी ४९ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले. २0१६ च्या खरीप हंगामात ५९१३ या नवीन सभासद शेतकर्यांना ४४ कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.