ग्रामपंचायत निवडणुकीत सहा हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 12:21 PM2021-01-21T12:21:48+5:302021-01-21T12:22:00+5:30
NOTA Button News जवळपास सहा हजार मतदारांनी ‘नोटा’ला (वरीलपैकी एकही नाही) मतदान करीत उमेदवाराबाबत नापसंती दर्शविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, जवळपास सहा हजार मतदारांनी ‘नोटा’ला (वरीलपैकी एकही नाही) मतदान करीत उमेदवाराबाबत नापसंती दर्शविली.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १५ जानेवारी रोजी एकूण ५३९ केंद्रांत दोन लाख ८८ हजार ६९१ पैकी दोन लाख १९ हजार ३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ जानेवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला. या निकालाने अनेकांना धक्का दिला तर काहींना सत्तेची संधी दिली. दरम्यान, वाॅर्डातील एकही उमेदवार पसंत नसेल, तर ‘ईव्हीएम’वर ‘नोटा’चा (वरीलपैकी एकही नाही) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुकीत एखाद्या वाॅर्डातील सर्वाधिक मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला, तर तेथे फेरनिवडणूक घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिला आहे. या आदेशात ‘नोटा’ हा ‘काल्पनिक उमेदवार’ समजून फेरनिवडणूक घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या एकाही वाॅर्डात ‘नोटा’ला सर्वाधिक मते पडण्याचा प्रकार घडलेला नाही. दरम्यान, जिल्ह्यातील सहा तालुके मिळून जवळपास ५९७५ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले आहे. एकूण झालेल्या मतदानापैकी जवळपास दोन टक्के मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. या मतदारांना वाॅर्डातील एकही उमेदवार पसंत पडल्याचे दिसून येत नाही.
वाशिम तालुक्यात सर्वाधिक ‘नोटा’
वाशिम तालुक्यातील २४ पैकी पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. तालुक्यातील ११४५ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबून वाॅर्डातील उमेदवारांबाबत नापसंती दर्शविल्याचे दिसून येते.