रोजगार हमी योजनेतील कुशलचा निधी दीड वर्षापासून रखडला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 04:14 PM2020-04-23T16:14:49+5:302020-04-23T16:15:12+5:30
निधी जिल्हा रोजगार हमी योजना विभागाकडून न आल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड तालुक्यात शेतकºयांच्या वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण झाल्यानंतरही गत दीड वर्षांपासून लाभार्थींना निधी मिळाला नाही. मात्र याच योजनेतील झालेल्या अकुशलचा कामाचा निधी प्राप्त झाला आहे. कुशलचा लाखो रुपयांहून अधिकचा निधी जिल्हा रोजगार हमी योजना विभागाकडून न आल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले.
जिल्हा रोजगार हमी योजना विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रिसोड कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडे अनुदान वर्ग करावे, अशी मागणी मोठेगाव येथील सतीश मांदळे, तांदळवाडी येथील शंकरराव देशमुख, भापुर येथील पंढरी बोडखे, शामराव बोडखे या शेतकºयांनी २३ एप्रिल रोजी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुका कृषी विभागाच्या व सामाजिक वनीकरण विभागाच्या फळबाग योजना याशिवाय इतर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत रिसोड तालुक्यात अनेक प्रकरणे मंजूर आहेत. ही कामे करत असताना दोन तीन टप्प्यांत अकुशलचा निधी मजुरांना दिला जातो. तर कुशलचा अंतिम टप्पा एकरकमी दिला जातो. मात्र तो लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण होत आहेत. अनुदानासाठी लाभार्थी सतत हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना निधी नाही, असे सांगून बोळवण केली जात आहे. यामध्ये लाभार्थींचा येण्या - जाण्यात पैशाचा व वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे तातडीने संबंधित विभागाने या बाबीची दखल घेऊन लाभार्थ्यांना निधी मिळेल अशा प्रकारे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी लाभार्थींनी केली.
या प्रकरणात मी स्वत: गांर्भीयपूर्वक लक्ष घातलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संपूर्ण माहीती आमच्या पर्यंत वेळेवर न पोचल्याने लाभार्थ्यांस अनुदान वेळेवर मिळु शकले नाही. या प्रकरणाची संपूर्ण माहीती वरीष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
- शंकर तोटावर
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाशिम