कोरोना चाचण्यांना बगल; ‘सीआरपी’, ‘एचआरसीटी’च्या आधारे बाधितांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 11:48 AM2021-09-18T11:48:22+5:302021-09-18T11:50:16+5:30
Corona Cases : कोरोना संसर्गाच्या शिकार ठरत आहेत, त्यांची खरी ‘हिस्ट्री’ लपविण्यात येत असल्याची चर्चा होत आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट निवळल्याचे दर्शविण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून दैनंदिन जाहीर केल्या जाणाऱ्या अहवालातही जिल्हा जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे भासविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच असून, कोरोना चाचणीला सोयीस्कर बगल देऊन ‘सीआरपी ब्लड टेस्ट’ (सी रिॲक्टिव्ह प्रोटीन), ‘एचआरसीटी’च्या (फुफ्फुस स्कॅनिंग अहवाल) आधारे काही खासगी दवाखान्यांमध्ये बाधितांवर उपचार केले जात असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने बहुतांश ठिकाणचे कोरोना चाचणी केंद्र बंद केले असून, कंत्राटी तत्त्वावर कार्यरत २६३ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याच्या शंकेला बळ येत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित एकूण रुग्णसंख्येच्या आकड्याने सध्या ४१ हजारांचा पल्ला गाठला आहे. अर्थात शहरांसह ग्रामीण भागातही आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचण्यांवर विशेष भर देण्यात आल्याने त्या पटीत बाधित रुग्ण निष्पन्न झाले; मात्र गेल्या काही दिवसांत दैनंदिन चाचण्यांच्या प्रमाणात घट झालेली आहे. परिणामी, बाधितांचा आकडाही घसरल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होणाऱ्या तीव्र स्वरूपाचा खोकला, तापेच्या एकाही रुग्णास कोरोना चाचणीचा सल्ला न देता ‘सीआरपी ब्लड टेस्ट’ आणि ‘एचआरसीटी टेस्ट’च्या आधारे उपचार केले जात असून, ज्या व्यक्ती कोरोना संसर्गाच्या शिकार ठरत आहेत, त्यांची खरी ‘हिस्ट्री’ लपविण्यात येत असल्याची चर्चा होत आहे.
‘सीआरपी’चा सल्ला झाला ‘काॅमन’
गेल्या काही दिवसांत वातावरणातील बदलाचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. सर्दी, खोकला, तापेच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, अधिक काळापासून ताप आणि खोकला असणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणीऐवजी रक्ताच्या चाचणीतील ‘सीआरपी’ करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्याचे प्रमाण वाढलेले असल्यास संबंधितांवर त्यानुसार उपचार केले जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
‘सीआरपी’च्या दैनंदिन ४०० चाचण्या
‘सीआरपी’ ही चाचणी कोविड-१९ च्या उपचारांत अत्यंत उपयुक्त ठरलेली चाचणी आहे. एखादा बाह्य विषाणू किंवा संसर्गामुळे शरीरात रासायनिक प्रक्रिया सुरू होते. यामुळे शरीरात सीआरपी निर्माण होऊन इन्फेक्शनची पातळी वाढते. दरम्यान, कोरोनाचे संकट उच्च पातळीवर असताना एकट्या वाशिम शहरात दैनंदिन १४०० ते १५०० ‘सीआरपी टेस्ट’ होत असत. हे प्रमाण सध्याही ४००च्या आसपास असल्याचे शहरातील ८ एम.डी. व २० डीएमएलटी पॅथाॅलाॅजीमधील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोरोना संसर्गाच्या संकट काळात शहरातील खासगी दवाखान्यांना कोविड केअर सेंटरची मान्यता दिली होती. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर ती मध्यंतरी रद्द करण्यात आली. असे असतानाही आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन न करता केवळ ‘सीआरपी’ किंवा ‘एचआरसीटी स्कोअर’च्या आधारे कोरोनाबाधितांवर उपचार करणे चुकीचे आहे. याप्रकरणी चाैकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- डाॅ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम