दमदार पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत किंचित वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:10+5:302021-06-26T04:28:10+5:30
जवळपास ४० वर्षांपूर्वी काजळेश्वरनजीक मोऱ्हळ येथे उभारलेल्या प्रकल्पावर उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वरसह इतर काही गावांतील शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे सिंचन ...
जवळपास ४० वर्षांपूर्वी काजळेश्वरनजीक मोऱ्हळ येथे उभारलेल्या प्रकल्पावर उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वरसह इतर काही गावांतील शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे सिंचन अवलंबून आहे. गत काही वर्षांत पावसाच्या अनियमिततेमुळे मोऱ्हळ प्रकल्प पूर्णपणे भरू शकला नाही, परंतु मागील दोन वर्षांत या प्रकल्पांत चांगला जलसाठा झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळाला होता. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या प्रमुख पिकांसह मका आणि भाजीपाला पिकांचेही उत्पादन या प्रकल्पाच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतले. काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या भरवशावर फळपिकांचेही उत्पादन घेतले आहे, तर पावसाचा खंड पडल्यानंतर खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठीही शेतकरी या प्रकल्पातील पाण्याचा आधार घेतात. आता यंदाही दमदार पावसामुळे पहिल्याच प्रकल्पाची पातळी वाढली आहे. त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळेच शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडल्यास पावसाळा संपण्यापूर्वीच हा प्रकल्प काठोकाठ भरण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.