६७ जिल्हा परिषद शाळांत ‘स्मार्ट बोर्ड’; ‘डीपीसी’कडे दोन कोटींचा प्रस्ताव!

By संतोष वानखडे | Published: September 13, 2023 04:57 PM2023-09-13T16:57:32+5:302023-09-13T16:57:48+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही स्मार्ट बोर्ड उपलब्ध करण्यासाठी शिक्षण विभागाने चाचपणी केली

'Smart Board' in 67 washim Zilla Parishad Schools; A proposal of two crores to 'DPC'! | ६७ जिल्हा परिषद शाळांत ‘स्मार्ट बोर्ड’; ‘डीपीसी’कडे दोन कोटींचा प्रस्ताव!

६७ जिल्हा परिषद शाळांत ‘स्मार्ट बोर्ड’; ‘डीपीसी’कडे दोन कोटींचा प्रस्ताव!

googlenewsNext

वाशिम : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ‘स्मार्ट बोर्ड’ची सुविधा उपलब्ध करण्याच्या दिशेने शिक्षण विभागाचे पाऊल पडत आहे. जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये डिजिटल इंटरॅक्टिव बोर्डसाठी दोन कोटींच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे लवकरच पाठविला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने बुधवारी (दि.१३) स्पष्ट केले.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७५ प्राथमिक शाळा आहेत. बहुतांश खासगी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, डिजिटल इंटरॅक्टिव बोर्ड यांसह विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या भौतिक सुविधा करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येदेखील डिजिटल इंटरॅक्टिव बोर्डची सुविधा उपलब्ध करण्याचा नावीण्यपूर्ण उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळेच शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडत आहेत. तंत्रज्ञान हे आकर्षक असल्याने ते वापरण्यास मुले उत्सुक असल्याचे एका निरीक्षणातून समोर आले आहे. विशेषत : प्राथमिक शाळेत, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मार्ट बोर्ड (डिजिटल इंटरॅक्टिव बोर्ड) वापरणे ही एक परिणामकारक पद्धत मानली जाते. त्यामुळे डिजिटल इंटरॅक्टिव बोर्डची मागणीदेखील वाढली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही स्मार्ट बोर्ड उपलब्ध करण्यासाठी शिक्षण विभागाने चाचपणी केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जास्त पटसंख्येच्या ६७ शाळांची तालुकानिहाय निवड करण्यात आली. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात दोन कोटींच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जाणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची १२ सप्टेंबरला मंजुरी घेण्यात आली. त्यामुळे ६७ शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Web Title: 'Smart Board' in 67 washim Zilla Parishad Schools; A proposal of two crores to 'DPC'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.