डिझेल पुरवठा सुरळीत; बसफेऱ्या नियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:55+5:302021-08-18T04:47:55+5:30
कोरोनाकाळात बससेवा बंद असल्याने प्रवाशांनी विविध पर्याय शोधत खासगी वाहतुकीवर विश्वास टाकला. त्यामुळे 'ब्रेक द चेन' अंतर्गत बसेस सुरू ...
कोरोनाकाळात बससेवा बंद असल्याने प्रवाशांनी विविध पर्याय शोधत खासगी वाहतुकीवर विश्वास टाकला. त्यामुळे 'ब्रेक द चेन' अंतर्गत बसेस सुरू होऊनही येथील आगाराला त्याचा मोठा फायदा झाला नाही. त्यातच आता डिझेलचा पुरवठा कमी-जास्त होत असल्याने काही आगारातून सुटणाऱ्या मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्यांमधूनच बंद करण्याची नामुष्की आगार प्रशासनावर ओढवत असली तरी वाशिम जिल्ह्यात सर्वच आगारांत डिझेलचा पुरवठा असल्याने बसफेऱ्या नियमित धावत आहेत.
--------
सर्वच आगारांना डिझेल पुरवठा
एसटी महामंडळाच्या अनेक आगारांना डिझेल तुटवडा भासत असल्याने बसफेऱ्या रद्द करण्याची वा बसगाड्या आगारातच उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र असा कोणताही प्रकार नसून, सर्वच आगारांना दिवसाकाठी आवश्यक प्रमाणात डिझेलचा पुरवठा होत आहे.
---------
नियोजित सर्वच फेऱ्या सुरू
वाशिम जिल्ह्यातील चारही आगारात डिझेलचा व्यवस्थित पुरवठा होत असल्याने प्रत्येक आगाराकडून नियोजित बसफेऱ्या नियमित सोडल्या जात आहेत. वाशिम आगारातून ३१, कारंजा आगारातून ३२, मंगरुळपीर आगारातून ३२, रिसोड आगारातून २७ बसगाड्या नियमित धावत आहेत. काही बसगाड्या मात्र तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. तथापि, या बसगाड्यांमुळे नियोजित फेऱ्यांवर कसलाही परिणाम झालेला नाही.
-------
जिल्ह्यातील आगार व कोरोना काळात झालेला तोटा
आगार - तोटा (मासिक)
वाशिम - १५ लाख
कारंजा - ३० लाख
रिसोड - २५ लाख
मंगरुळपीर - १० लाख
----------
कोट: प्रवाशांची संख्या लक्षात घेता बसफेऱ्यांचे योग्य नियोजन असून, डिझेल पुरवठा सुरळीत असल्याने अद्याप बसफेरी बंद करण्याची वेळ आली नाही. सर्वच बसफेऱ्या नियमित धावत आहेत.
-विनोद ईलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम.