कोट्यवधींचा गुटखा जप्त करूनही तस्करी सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:42 AM2021-01-02T11:42:38+5:302021-01-02T11:44:38+5:30
Washim News वाशिम जिल्ह्यात गुटखा तस्करी सुरूच असून पानटप-यांवर राजरोस विक्री केली जात आहे.
- सुनिल काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाने प्रतिबंध लादलेला गुटखा आढळून आल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने गत वर्षात धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला. असे असताना परराज्य तथा इतर जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात गुटखा तस्करी सुरूच असून पानटप-यांवर राजरोस विक्री केली जात आहे.
२०२० या वर्षात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने घरात लपवून ठेवलेला तथा छुप्या मार्गाने वाहनांद्वारे पोहोचविला जाणारा गुटखा जप्तीच्या असंख्य कारवाया केल्या. त्यात प्रमुख्याने १८ मार्च २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इरफान अहमद खान सुभेदार खान याच्या राहत्या घरात छापा मारून एक लाख ५८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ८ मे २०२० रोजी भोकरखेडा (ता. रिसोड) येथील दत्ता कौतिका रंजवे याच्या घरातून चार लाख ३५ हजार ५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच ३ ऑक्टोबर २०२० रोजी मालेगाव-शेलूबाजार रस्त्यावर नाकाबंदी करून यू.पी. २१ सी.एन. २३२३ या क्रमांकाचा ट्रक थांबवून पोलिसांनी त्यातील विमल पानमसाला, व्ही-१ सुगंधित तंबाखू असा तब्बल ९३ लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा आणि २५ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. या काही मोठ्या कारवायांसह वर्षभरात गुटखाजप्तीच्या इतरही असंख्य कारवाया करण्यात आल्या; मात्र त्यानंतरही गुटखा तस्करी तथा विक्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
एप्रिलपासून जप्त गुटख्याची विल्हेवाट लागली नाही!
पोलीस विभागाकडून जप्त करण्यात आलेला गुटखा नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. असे असताना न्यायालयाचे आदेश अप्राप्त असल्याने एप्रिल २०२० या महिन्यापासून जप्तीचा गुटखा पोलीस ठाण्यांमध्येच पडून आहे. त्याची विल्हेवाट अद्यापपर्यंत लागलेली नाही.
गुटखापुड्या जाळण्याची स्वतंत्र व्यवस्थाच नाही
दरवर्षी अवैधरीत्या वाहतूक होत असलेला कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला जातो. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाकडे असते; मात्र जप्तीच्या गुटखापुड्या जाळण्याची स्वतंत्र व्यवस्था अद्याप निर्माण झालेली नाही. कुठल्याही एखाद्या कारखान्याच्या बॉयलरमध्ये हा गुटखा जाळला जातो.
महाराष्ट्रात गुटखाबंदी असली तरी नजीकच्या काही राज्यांमध्ये सर्रास गुटखा उत्पादित केला जातो. तेथूनच छुप्या मार्गाने तो राज्यात आणला जातो. माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन व अन्न, औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. २०२० मध्ये जप्त केलेला गुटखा पोलीस ठाण्यांमध्येच पडून आहे. तो प्राप्त झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल.
सागर टेरकर सहायक उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला