मराठवाड्यातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:41 AM2021-01-12T11:41:21+5:302021-01-12T11:43:44+5:30
Smuggling of sand in Washim वझर घाट (ता.जिंतूर, जि.परभणी) आणि मंठा (जि.जालना) येथून वाहणाऱ्या नदीघाटावरून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरू आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठवाड्यातील हिंगोली-परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील पूर्णा नदीनजूक वसलेला वझर घाट (ता.जिंतूर, जि.परभणी) आणि मंठा (जि.जालना) येथून वाहणाऱ्या नदीघाटावरून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरू आहे. ही रेती वाशिममध्ये आणली जात असून अनेक रेती तस्कर या ठिकाणी सक्रिय झाले आहेत. असे असताना महसूल विभागाचे कर्मचारी रेती तस्करांसोबत अर्थपूर्ण व्यवहारांमधून ‘मॅनेज’ झाल्याने कुणावरही कारवाई होत नसल्याचे उघड होत आहे.
पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने वाशिम जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा गेल्या ५ वर्षांपासून लिलाव झालेला नाही. असे असतानाही बांधकामांसाठी लागणारी रेती ठरावीक पैसे मोजल्यास सहज उपलब्ध होत आहे. यासंबंधी अधिक माहिती घेतली असता, मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत असलेल्या नदीवरून आणि मंठा (जि.जालना) येथील नदीघाटावरून हिंगोली जिल्ह्यातील कापडशिंगी, सेनगाव, गोरेगाव, कोळंबी यामार्गे वाशिम शहरातील हिंगोली रोडवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळून चोरीची रेती अवैधरीत्या वाशिममध्ये आणली जात आहे.
सद्यस्थितीत वझरजवळून वाहणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक असल्याने तेथून होणारी रेतीची वाहतूक बंद आहे; मात्र मंठा येथून हिंगोली-जालना या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील बन या गावात स्टॉप घेऊन तेथून हिंगोली व वाशिम या दोन जिल्ह्यांना रेती सप्लाय केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
याबाबत महसूल विभागाला पुरेशी कल्पना आहे; परंतु अर्थपूर्ण सेटलमेंटमुळे कुणावरही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
चोरट्या मार्गाने होत असलेल्या रेती वाहतुकीसंदर्भात सखोल चौकशी करण्यात येईल. तहसीलदारांशी समन्वय साधून तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला जाईल. याउपरही हा गंभीर प्रकार थांबला नाही; तर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला जाईल.
- प्रशांत जाधव,
जिल्हा खनिकर्म अधिकारी, वाशिम
रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. याऊपरही हा प्रश्न सुटणे कठीण झाले आहे. नागरिकांनीदेखिल सजग राहून माहिती द्यायला हवी. कारवाईची गती यापुढे निश्चितपणे वाढविली जाईल. तशा सुचना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या जातील.
- विजय साळवे
तहसीलदार, वाशिम