सर्पदंश झालेल्या बालकाचा उपचाराअभावी मृत्यू; ग्रामस्थांनी केली आरोग्य केंद्राची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 12:41 PM2020-09-04T12:41:22+5:302020-09-04T12:41:32+5:30
सर्पदंशावर उपचारासाठी आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने, तसेच डॉक्टरांनी योग्य तपासणी न करताच त्याला अकोला येथे नेण्याचा सल्ला दिला.
लोकमत न्यु नेटवर्क
मेडशी (वाशिम) : येथील एका सहा वर्षीय बालकास सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला. त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले; परंतु तेथे सर्पदंशावर उपचारासाठी आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने, तसेच डॉक्टरांनी योग्य तपासणी न करताच त्याला अकोला येथे नेण्याचा सल्ला दिला. अकोला येथे नेण्यात येत असतानाच या बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालून साहित्याची तोडफोड केली.
मेडशी येथील विशाल संतोष घुगे या सहा वर्षीय बालकास गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सर्पदंश झाला. त्याने याबाबत त्याचे वडिल संतोष घुगे यांना सांगितले. त्यानुसार वडिलांनी तातडीने त्याला मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्या ठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांनी बालकाची योग्यरित्या तपासणी न करताच त्याला अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला, असे विशाल घुगे याचे पिता संतोष घुगे यांनी सांगितले. त्यानंतर विशाल घुगे यास अकोला येथे उपचारासाठी नेण्यात येत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. यामुळे गावकºयांच्या संताप अनावर झाला आणि या संदर्भात मालेगाव पोलिसांना माहिती देऊन त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालत तोडफोड केली. रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बनसोडे आणि मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने हे मेडशीत दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली.
इन कॅमेरा करणार शवविच्छेदन
मेडशी येथील विशाल घुगे या बालकाचा सर्पदंशानंतर उपचाराअभावी मृत्यूू झाला. त्यामुळे गावकºयांनी बुधवारी रात्रीच मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत संबंधित वैद्यकीय अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली. त्यावेळी मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी मृतक विशालचे इन कॅमेरा शवच्विच्छेदन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि अहवालानुसार कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानुसार रात्रीच विशालचा मृतदेह मालेगाव येथे हलविण्यात आला; परंतु तेथे कॅमेºयांची सुविधा नसल्याने मृतदेह वाशिम येथे आणावा लागला.