राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सरसावल्या सामाजिक, स्वयंसेवी संस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:09 AM2017-08-15T01:09:46+5:302017-08-15T01:10:33+5:30
वाशिम: देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन उद्या, मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाचा अनावधानाने अपमान होऊ नये म्हणून विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम आणि प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती करून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासह प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. या स्वयंसेवी संस्थांमध्ये मारवाडी युवामंच, राजरत्न बहुद्देशीय संस्था, राष्ट्रीय हरित सेना, युवती आणि युवक मित्रांसह सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन उद्या, मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाचा अनावधानाने अपमान होऊ नये म्हणून विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम आणि प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती करून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासह प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.
या स्वयंसेवी संस्थांमध्ये मारवाडी युवामंच, राजरत्न बहुद्देशीय संस्था, राष्ट्रीय हरित सेना, युवती आणि युवक मित्रांसह सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
राजरत्न संस्थेकडूनही पत्रक काढून जनतेला राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याकरिता काळजी घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहु.संस्था वाशिमच्यावतीने करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी लहान मुले प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात, त्यामुळे आपल्या हातून नकळत राष्ट्रवजाचा अवमान होतो, हा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज घेऊ नये, राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा, याकरिता संस्थेच्यावतीने राष्ट्रध्वज सन्मान पथक तयार केले असून, वापरास उपयुक्त नसलेले, खराब झालेले, रस्त्यावर किंवा मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. सन्मान पथकात पंधरा युवक, युवती सहभागी होणार असून, ते शहरातील मुख्य रहदारीच्या भागात, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मैदानावर फिरुन पडलेले राष्ट्रध्वज संकलीत करुन तहसील कार्यालयात जमा करतील. भारतीय संहितेमध्ये दिलेल्या नियमाप्रमाणे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, यासाठी काटेकोर पालन करण्याचे आवाहन राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, अरविंद उचित, सत्येंद्र भगत, महादेव क्षीरसागर, संतोष हिवराळे, नंदिन हिवराळे, हंसिनी उचित, सोनल तायडे, सुमेध तायडे, नितीन अढाव, विकास पट्टेबहादूर, भगवान ढोले, समाधान करडीले, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, आदीच्यावतीने करण्यात आले आहे.
वाशिम येथील युवतीमित्र स्नेहल तायडे यांनी जनतेला राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकपासून बनविलेले राष्ट्रध्वज घेतल्या जातात. मुलांच्या हट्टाकरिता पालक असे राष्ट्रध्वज घेऊन देतात. कालांतराने ते इतस्त: पडतात. यामुळे नकळत आपल्या हातून राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन स्नेहल तायडे यांनी केले आहे.