सामाजिक उपक्रमासाठी ‘मी वाशिमकर गृप’ ठरतोय मोलाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 02:31 PM2019-05-13T14:31:56+5:302019-05-13T14:32:32+5:30
वाशिम : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिक, महिलांचा ‘मी वाशिमकर गृप’ सामाजिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी, सामाजिक उपक्रम एक चळवळ करण्यासाठी मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिक, महिलांचा ‘मी वाशिमकर गृप’ सामाजिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी, सामाजिक उपक्रम एक चळवळ करण्यासाठी मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. कोणतीही बैठक असो, कार्यक्रमाचे नियोजन असो वा उपक्रम या गृपवर माहिती टाकल्याबरोबर सर्वच सदस्य सक्रीय होवून ते काम हाती घेवून पूर्ण करण्याची जबाबदारी पार पडत आहेत. त्यांच्या या उपक्रमात खुद्द नगरपालिका, जिल्हा प्रशासनही मदतीस उतरत आहे हे विशेष!
गतवर्षीपासून प्रत्यक्षात सामाजिक उपक्रमात सक्रीय झालेला हा वाशिमकर गृप करीत असलेल्या कार्याची जिल्हयात चर्चा होत आहे. सर्वप्रथम शहराचे आराध्य दैवत बालाजी संस्थानसमोरील अतिप्राचिन देव तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेवून कार्यास प्रारंभ केला. यातील वाढता लोकसहभाग पाहता दरवर्षी शहरातील एक तरी तलाव खोलीकरण, दुरुस्ती करण्याचा निर्णय गृपने घेतला. गतवर्षी देव तलावाचे केलेले काम पुन्हा यावर्षी करावे यासाठी बालाजी संस्थानच्या विश्वस्तांची भेट घेवून आपले मत व्यक्त केले. विश्वस्तांनी त्यांच्या कार्याची, उपक्रमाचे कौतूक करुन यावर्षी आपण स्वत: या उपक्रमात उतरुन हे कार्य पार पाडणार असल्याचे सांगितले. यावेळी शहरातील लुप्त पावलेल्या तलावाचे कार्य हाती घेण्याचा निणर्य या गृपने घेतला. हा निर्णय घेतांना या बाबतची सर्व माहिती , आपआपले मत या गृपवरुन प्रसारित करण्यात आले.
विशेष म्हणजे यामध्ये वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी स्वताहून या उपक्रमात सहभाग व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या भागातील नगरसेवक उमेश मोहळे यांनी सुध्दा पोकलॅन मशिन देण्याचे सांगितले. प्रत्यक्षात १३ मे रोजी पासून या कामास सुरुवात झाली आहे. या तलावाच्याबाजुला असलेल्या नालीचे पाणी काढण्यासाठी , त्याला दिशा देण्यासाठी गृपवर चर्चा करुन तोडगा काढण्यात येत आहे.