नागरिकांची तहान भागविण्यासाठी सरसावले समाज सेवक, पदाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:01 PM2018-04-24T14:01:25+5:302018-04-24T14:01:25+5:30
वाशिम: जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना मालेगाव आणि मंगरुळपीर येथील तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनाही कुचकामी ठरल्या आहेत.
वाशिम: जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना मालेगाव आणि मंगरुळपीर येथील तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनाही कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्याअभावी हाल होत असल्याने दोन्ही शहरातील समाजसेवक आणि नगरसेवकांकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाल्याने दोन्ही शहरांत तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारे चाकातिर्थ धरण आणि मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण आटले आहे. या धरणात आता अत्यल्प मृतसाठा उरला आहे. त्यातच मालेगाव नगर पंचायतच्यावतीने पूर्ण करण्यात आलेली कुरळा ते चाकातिर्थ या योजनेसाठी वापरण्यात आलेले एक किलोमीटर अंतराचे पाईप जुने असल्याने ते वारंवार लिकेज होऊन शहराचा पाणी पुरवठा खंडित होत आहे. तर मंगरुळपीर शहराची प्रस्तावित पाणी पुरवठा योजना वांद्यात सापडली आहे. त्यामुळे या दोन्ही योजना कुचकामी ठरल्याने नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही शहरांतील कूपनलिका आणि विहिरी कोरड्या झाल्या आहेत. अशात मालेगाव नगर पंचायतचे काही पदाधिकारी, नगर सेवक आणि मंगरुळपीर नगर परिषदेतील काही पदाधिकारी नगरसेवकांनी नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून, मालेगाव शहरात गत महिनाभरापासून नगरसेवक आणि समाजसेवक टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत, तर मंगरुळपीर शहरातही गेल्या आठवड्यापासून नगरसेवकांसह समाज सेवकांनी नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.