मासिक पाळीबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने सोडले ‘करिअर’वर पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:03 PM2018-07-28T15:03:18+5:302018-07-28T15:06:04+5:30
- नाना देवळे
मंगरूळपीर (जि. वाशिम ) : किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये मासिकपाळी संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालूक्यातील शेलुबाजार या गावातील स्नेहल चौधरी या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने आपल्या करिअरला बाजुला सारले. राज्यातल्या वेगवेगळ्या वयोगटातील २५ हजार महिला आणि मुलींपर्यंत मासिकपाळी संदभार्तील शास्त्रशुध्द माहिती पोहचवून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्यात या तरुणीने यश मिळविले आहे.
स्नेहल चौधरी मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी कार्यालयात कामानिमीत्त आल्या असता प्रस्तुत प्रतिनिधीने त्याच्यांशी संवाद साधला. मासिकपाळी हा कोणताही लाजिरवाणा विषय नाही. ती एक श्वसनासारखी नैसर्गिक प्रक्रिया. जर या विषयावर व्यक्त होण्यासाठी मुली पुढे आल्या नाही तर हा गैरसमज तसाच राहिल. एकविसाव्या शतकातही मासिकपाळीला शाप समजले जाते. आजार समजून मुली शाळा सोडतात, लाजिरवाणा विषय म्हणून शिक्षक चर्चा करीत नाही. हे चित्र बदलणे नव्या पिढीची जबाबदारी आहे असे मानून चौधरी यांनी ‘क्षितीज फाऊंडेशन’ संस्थेच्या माध्यमातून ‘ब्लीड द सायलेन्स’ चळवळ सुरू केली. सुरुवातीला त्यांनी सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालये, अंगणवाडीत जाऊन जनजागृतीपर व्याख्याने देण्यास सुरुवात केली . ग्रामीण भागात ७४ टक्के महिलांना मासिक स्वच्छतेतेचे जुजबी ज्ञान आहे. ग्रामीण भागात सॅनेटरी नॅपकिन्स न वापरता रक्तस्त्राव थांबवण्यासाठी राख, गवत, वर्तमानपत्र, कापड या सारख्या चुकीच्या पध्दतीचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करागसारख्या विकाराला सामोरे जावे लागत आहे. मासिकपाळीच्या दिवसात घरकाम, स्वयंपाकघर, देवपूजेपासून दूर ठेवणे, आंघोळ करू न देणे असे अनेक गैरसमज असल्याचे चौधरी यांना दिसून आले. जनजागृती कार्यशाळेत मासिकपाळी संदर्भातील शास्त्रीय माहिती देऊन गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी राज्यभरात फिरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून सकारात्मक महिलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला. सोलापूरमध्ये घेतलेल्या कार्यशाळेनंतर महिला पोलिस कॉन्स्टेबल मासिकपाळी बद्दल व्यक्त होऊ लागल्या. या सगळ्याच श्रेय त्या आई वडील व क्षितीजची पुर्ण चमूला देतात.
मासिकपाळीबद्दल ग्रामीण भागातील महिला डॉक्टरांशी खुलेपणाने चर्चा करू लागल्या आहेत. राज्यातील २५ हजार मुली, महिलांपर्यंत पोहचून सकारात्मक बदल आता दिसू लागले आहेत. पण इतक्यावरच न थांबता आता दृष्टीहिन, अपंग, विशेष मुलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे.
- स्नेहल चौधरी.