वन परिसरातील सौर कुंपण योजना अडकली लालफितीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:48 AM2021-02-17T04:48:33+5:302021-02-17T04:48:33+5:30
वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान आणि यातून घडत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जंगली भागातील शेती सौर कुंपणाने संरक्षित करण्यासाठी शासनाने ...
वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान आणि यातून घडत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जंगली भागातील शेती सौर कुंपणाने संरक्षित करण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेंतर्गत शिव पीक संरक्षण योजना राबविण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला. या योजनेत गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ यासह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे. शिव पीक संरक्षण योजनेंतर्गत सौर कुंपण योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी शासनाने वनालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अभिप्राय मागविण्यासह वन्यप्राण्यांमुळे सर्वाधिक पीक नुकसान होणाऱ्या गावांची यादी तयार करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलावून यासंदर्भातील कृती आराखडा तयार केला. संवेदनशील असलेल्या वनपरिक्षेत्राच्या सीमेपासून ५ किलोमीटर अंतरात असलेल्या गावांत सामूहिक जाळीचे कुंपण या योजनेंतर्गत तयार करण्याचे नियोजित असून, तसा आराखडा वनविभागाने शासनाकडे सादर केलेला आहे. दीड महिना उलटून गेला तरी या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही थांबली आहे.
--
शेतकऱ्यांना मिळणार ७५ टक्के अनुदान
शिव पीक संरक्षण योजनेत शेतकऱ्यांना कुंपणासाठी सौरऊर्जाचलित पॅनेल शेतालगत बसविण्यासाठी एकूण खर्चाच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये यापेक्षा कमी असणारी रक्कम देण्यात येणार आहे. ही योजना सामूहिक स्वरूपाची असल्याने सलग शेती असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आवश्यक आहे.
---
शासनाच्या निर्देशानुसार शिव पीक संरक्षण योजनेंतर्गत सौर कुंपणासाठी शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्यात आले. त्यात ३० गावांत बैठकी घेण्यात आल्या. ही योजना सामूहिक स्वरूपाची असल्याने सलग शेती असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे.
-सुमंत सोळंके,
उपवनसंरक्षक, वाशिम