सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मिटणार सात गावातील विजेचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:24+5:302021-04-02T04:43:24+5:30
मांगूळझनक वीज केंद्रांतर्गत येत असलेल्या तथा शिरपूरपासून जवळच असलेल्या केशवनगर येथे दीड ते दोन वर्षांपासून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ...
मांगूळझनक वीज केंद्रांतर्गत येत असलेल्या तथा शिरपूरपासून जवळच असलेल्या केशवनगर येथे दीड ते दोन वर्षांपासून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे हे काम ठप्प पडले होते; मात्र आता पुन्हा नव्या दमाने काम सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पाकरिता शिरपूर व येवता या दोन ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १० एकर शेती दिलेली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मसलापेन, केशवनगर, शेलगाव राजगुरे, गोवर्धना, चिंचाबापेन, पेडगाव या सात गावामधील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३.२५ मे.वॅ. वीज निर्मिती होणार आहे.
सदर सौर ऊर्जा प्रकल्प आधी शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या विजेची गरज भागविण्याकरिता निर्माण करण्याची बाब प्रस्तावित होती; मात्र अपेक्षित प्रमाणात जमीन उपलब्ध न झाल्याने कमी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आता केवळ घरगुती वीज पुरवठ्याची अडचण निकाली निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...............
कोट :
केशवनगर येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी कामाची गती मंदावली होती; मात्र गत काही दिवसापासून त्यास वेग देण्यात आला असून येत्या दोन ते तीन महिन्यात प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. परिसरातील सात गावामधील घरगुती वीज ग्राहकांना या प्रकल्पांतर्गत वीजपुरवठा केला जाईल.
आकाश देवतळे
सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय, मांगूळझनक