मेंदूविकाराने सैनिकाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:31+5:302021-05-08T04:43:31+5:30
मूळगाव पिंप्रीमोडक येथील रहिवासी असलेले संजय राठोड हे सन २००१ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. सुरुवातीला दहा वर्षे त्यांनी ...
मूळगाव पिंप्रीमोडक येथील रहिवासी असलेले संजय राठोड हे सन २००१ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. सुरुवातीला दहा वर्षे त्यांनी मथुरा येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर जम्मू आणि उदमपूर येथे प्रत्येकी दोन वर्षे तर नाशिक येथे पाच वर्षे कर्तव्य पार पाडले. सध्या नाशिक येथून त्यांची मथुरा येथे पुन्हा बदली झाली होती. तत्पूर्वी ते मूळगावी पिंप्रीमोडक येथे काही दिवसांच्या सुट्टीवर आले होते. परंतु, अचानक त्यांना डोक्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी अमरावती येथे नेण्यात आले. तेथून पुढील उपचाराकरिता पुणे येथील सैनिकी दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने ६ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय सैन्यात त्यांनी १९ वर्षे आपली सेवा दिली. त्यांच्या अशा अपघाती निघून जाण्याने राठोड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ७ मे ला त्यांच्या मूळगावी पिंप्रीमोडक येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कारंजाचे नायब तहसीलदार ढोबळे, पोलीस उपविभागीय अधिकारी तथा ठाणेदार अनिल ठाकरे, भारतीय सैन्यदलातील सैनिक अनिल राठोड, पिंप्री मोडक येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. संजय राठोड यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण, दोन मुले असा परिवार आहे.