शिक्षक दाम्पत्याचा मुलगा झाला पोलीस उपमहानिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:01+5:302021-05-23T04:41:01+5:30
मालेगाव येथील पाठक शिक्षक दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा श्रीकांत पाठक यांनी मेहनतीने आणि जिद्दीने आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. पदोन्नतीतून ...
मालेगाव येथील पाठक शिक्षक दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा श्रीकांत पाठक यांनी मेहनतीने आणि जिद्दीने आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. पदोन्नतीतून ते पोलीस उपमहानिरीक्षक बनले आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासात ते २००८ ला संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयपीएस बनले. पोलीस उपअधीक्षक, नंतर पोलीस अकॅडमीचे असिस्टंट डायरेक्टर, नंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक (राज्य गुप्त वार्ता), मुंबईचे पोलीस उपायुक्त, राज्य राखीव दलचे कमांडंट म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पोलीस दलात विशेष कामगिरी केली म्हणून त्यांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत बीड, नाशिक, पुणे, मुंबई, श्रीरामपूर, दौंड या विविध शहरांत उत्कृष्ट सेवा दिली आहे. आता त्यांची वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून निवड झाली असून, ते लवकरच पोलीस उपमहानिरीक्षकपदी रुजू होणार आहेत. मालेगावसारख्या छोट्या शहरातून एवढ्या उच्च पदावर गेल्यामुळे मालेगाव शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चमकले आहे. वेगळ्या ठिकाणी सेवा देत असतानाही श्रीकांत पाठक यांची मालेगाव शहराशी नाळ अजूनही घट्ट आहे. येथे आल्यानंतर ते मित्र, गावातील लोक, शेजारी या सर्वांना भेटून ते आस्थेने चौकशी करतात. शहरातील अनेक लोकांच्या अडीअडचणी सोडवितात.