सोनल प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’; नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 03:00 PM2019-10-29T15:00:13+5:302019-10-29T15:00:26+5:30
प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेलुबाजार येथील अडाण नदीला पुर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार: गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सोनल प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून, या प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने आता शेलुबाजार येथील अडाण नदीलाही पूर आला आहे. या पुरामुळे दोन दिवसांपासून आठवडी बाजारातील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील ग्रामस्थांची वहिवाट बंद झाली आहे.
मंगरुळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातच पावसाने गेल्या १५ दिवसांपासून ठाण मांडले आहे. या पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्या यंदा हद्दपार झाली आहे, तर रब्बी हंगामासाठीही शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा विश्वास वाटू लागला आहे. यात मालेगाव तालुक्यात असलेल्या; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगननजिक असलेला सोनल प्रकल्प दहा दिवसांपूर्वीच ओव्हर फलो झाला होता. आता पावसाची सतत रिपरिप सुरू असल्याने आणि त्यातच गत दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्याने या प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेलुबाजार येथील अडाण नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी शेलुबाजार येथील आठवडी बाजारात असलेल्या पुलावरून वाहू लागले आहे. सोमवारी या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे या पुलावरील ग्रामस्थांची वहिवाटच बंद झाली. सोमवारी सायंकाळपर्यंतही या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्याचा परिणाम ग्रामीण जनजिवनावर झाला.
नद्या, नालेही वाहताहेत दूथडी भरून
मालेगाव तालुक्यातून वाहणारी काटेपूर्णा नदी पावसाळा उलटल्यानंतरही कोरडीच होती; परंतु गत १० ते १५ दिवसांपासून पडत पडलेल्या सततच्या पाण्याने काटेपूर्णा नदी आता दुथडी भरून वाहत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील लहानसहान नद्या आणि नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजासह रिसोड आणि वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागांतही पावसामुळे अनेक नद्या, नाल्यांचे पात्र फुगल्याचे सोमवारी दिसून आले. पावसाची अशीच रिपरिप कायम राहिली, तर ग्रामीण भागातील नदी, नाल्यांच्या काठावरील शेतजमिनींचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आणखीच मोठे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.